पणजी मनपा निवडणूक 14 मार्च रोजी शक्य
सोमवारी अधिकृत घोषणा : दोन गटांमध्ये चुरशीची लढत होणार
पणजी : पणजी महानगरपालिकेची निवडणूक येत्या 14 मार्च रोजी होणार असून मतमोजणी 16 मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याची अधिसूचना येत्या सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात येणार असून त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू होणार आहे. पणजी महानगरपालिकेचा पाच वर्षांचा कालावधी पुढील मार्च महिन्यात संपुष्टात येणार असून तत्पूर्वी निवडणुका होणार आहे. त्याच अनुषंगाने आयोगाने प्रभाग पुनर्रचना आणि त्याचे आरक्षणही निश्चित केले आहेत.
मंत्री बाबुश विरुद्ध उत्पल अशी लढत होणार
सोमवारी पणजी मनपा निवडणूक एकंदरीत सविस्तर कार्यक्रम जाहीर होणार असून त्यानंतर रणधुमाळी सुरू होणार आहे. सध्या मनपावर पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांचे वर्चस्व असून ते आपला गट उतरविणार आहेत. त्याशिवाय उत्पल पर्रीकर यांचाही गट उतरणार असल्याने निवडणुकीत कमालीचा रंग भरणार, अशी चिन्हे दिसत आहेत.