पणजी बाजारपेठेत ‘फराळाची’ मेजवानी
लहान, मोठ्या आकाराच्या करंज्या : स्वयं साहाय्य गटांतर्फे घरपोच सेवा,‘वजे’साठी मोठ्या करंज्यांना मागणी
पणजी : गणेशचतुर्थीच्या पावन पर्वाची तयारी रंगात आलेली आहे. या पर्वाला समर्पित असलेल्या अनेक परंपरागत खाद्यपदार्थांची मेजवानी बाजारपेठेत दाखल झालेली आहे. पणजी बाजारपेठेतील खाद्यविक्रेत्यांनी चकल्या, लाडू, करंजा आणि इतर फराळाच्या विक्रीसाठी सज्जता ठेवली आहे. गणेशचतुर्थी निमित्त विशेष करंज्याचा बेत हा गोव्यात खास असतो. चतुर्थीला काही दिवस असतानाच घरोघरी करंज्या तयार करण्याचे काम महिलांद्वारे सुरु करण्यात येते. यात पिठ्याच्या, मुग, रवा, खोबऱ्याच्या, तिखट-गोड करंज्या गोव्यात केल्या जातात.
बाप्पाच्या दर्शनासाठी घरी येणाऱ्या लोकांना करंज्या देतात. पणजी बाजारपेठेत पाच करंज्यांचे पाकिट 100 रुपयांना तर खास ‘वजे’च्या स्वरुपात देण्यात येणाऱ्या करंज्या 35 रुपयांना एक अशा दराने विकल्या जात आहेत. पणजी बाजारपेठेतील इतर पदार्थांचे दर बघण्यास गेलो तर सध्या वेगवेगळ्या प्रकारचा शेव, चिवडा, मुगाचे लाडू, बेसन लाडू, रव्याचे लाडू 300 ते 400 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. साजूक तुपातले लाडू 550 ते 600 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. खोबऱ्याच्या वड्या 350 रुपये प्रतिकिलो, फेणोरी 250 ऊपये 250 ग्रॅम पाकिट, चकली आणि शंकरपाळ्या 200 ते 250 रुपये प्रतिकिलो अशा दराने विकल्या जात आहे.
स्वयं साहाय्य गटांतर्फे घरपोच सेवा
आज अनेक लोक नोकरी किंवा कामानिमित्त बाहेर असल्याने घरात चतुर्थीचा फराळ तयार करणे त्यांना शक्य नसते. बहुतांश लोक स्वयं साहाय्य गटांनी तयार केलेल्या पदार्थांना प्राधान्य देतात. अशा लोकांसाठी राज्यातील विविध गटांतर्फे ऑनलाईन आणि घरपोच सेवा प्रदान करण्यात येत आहे. सरकारने ऑनलाईन बाजार सुऊ केल्याने, या महिलांनी बनविलेल्या अनेक खाद्यपदार्थांना ऑर्डर्स मिळत आहेत.
‘वजे’साठी मोठ्या करंज्यांना मागणी
राज्यात ‘चवथीचे वजे’ पाठवण्याची परंपरा आहे. नवीन लग्न झालेल्या मुलीच्या घरी वजे पाठवले जाते. त्यात करंज्या, फराळ, माटोळीला लागणारे साहित्य पाठवले जाते. हे वजे म्हणजे मायेचे आणि स्नेहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. यातील करंज्या आकाराने मोठ्या असतात. अशा करंज्या 35 ते 40 ऊपये एक अशा दराने विकल्या जात आहेत.
पारंपरिक फराळातून पूरक आहार
चतुर्थीच्या काळात भारतीय संस्कृतीत पारंपरिक खाद्य पदार्थांचे विशेष महत्व आहे. विविध पारंपरिक पदार्थ तयार करून पूरक आहाराचा आनंद जनतेद्वारे घेण्यात येतो. हे पारंपरिक खाद्यपदार्थ फक्त स्वादिष्टच असतात असेच नाही, तर त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे स्वास्थ्यासाठीही लाभकारी ठरतात. म्हणूनच चतुर्थीच्या सणात पारंपरिक खाद्य पदार्थांची निर्मिती अनिवार्य आहे जी सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टीने महत्वाची आहे.