दिवाळीच्या खरेदीसाठी पणजी बाजारपेठ सजली; आकाशकंदील, तोरणे अन् पणत्यांना पसंती
दिवाळीच्या स्वागतासाठी घर सजविण्याला विशेष महत्त्व असल्याने आकाशकंदील, तोरणे, पणत्या, रांगोळीचे रंग आणि लक्ष्मीची पावले यांना बाजारात मागणी वाढली आहे. पारंपरिक कागदी आकाशकंदिलांसोबतच कापडी पट्ट्यांपासून तयार केलेले, झिरमिळ्या असलेले आणि आधुनिक डिझाइनमधील आकाशकंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. लहान घरांसाठी छोटे, तर प्रशस्त घरांसाठी मोठ्या आकाराचे आकाशकंदील उपलब्ध असून, त्यांचे दर साधारण 250 ते 1500 रुपयांपर्यंत आहेत. विशेष आकर्षक आणि मोठ्या आकाराच्या कंदिलांसाठी यापेक्षा अधिक किंमत मोजावी लागत आहे.
तोरणे, लक्ष्मीच्या पावलांना पसंती
घराच्या प्रवेशद्वाराला सणाचा साज चढवण्यासाठी विविध प्रकारच्या तोरणांची खरेदी केली जात आहे. आंब्याच्या पानांची तोरणे, फुलांच्या माळा, मोत्यांची तोरणे, लटकन असलेली सजावटीची तोरणे तसेच कृत्रिम फुलांपासून तयार केलेल्या तोरणांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. या तोरणांचे दर साधारण 150 ते 800 रुपयांपर्यंत आहेत. लक्ष्मीची पावले आणि अन्य सजावटीच्या वस्तूंनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
रांगोळीच्या रंगांसह सजावटीच्या वस्तूंची रेलचेल
दिवाळीतील सजावटीत रांगोळीला विशेष स्थान असल्याने बाजारात विविध रंगांचे रांगोळीचे रंग, तयार रांगोळीचे साचे, ठिपक्यांच्या रांगोळीचे नमुने आणि फुलांच्या रांगोळीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाले आहे. रांगोळीच्या रंगांच्या पाकिटांचे दर साधारण 20 ते 100 रुपयांपर्यंत आहेत.
याशिवाय तयार रांगोळी स्टिकर्स, आकर्षक रांगोळी डिझाईन्स, कृत्रिम फुलांच्या माळा, भिंतींवर लावण्याच्या कलाकुसरीच्या वस्तू, शुभेच्छा फलक आणि सजावटीच्या टोपल्यांनाही मागणी आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या पूजेच्या थाळ्या, कलश, घंटा, अगरबत्ती स्टँड, समई, हळद-कुंकवाच्या डब्या आणि अन्य पूजासाहित्याने दुकाने सजली आहेत.
दिवाळी जवळ येत असल्याने आगामी दिवसांत बाजारपेठेतील खरेदीची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असून, पणजी बाजारपेठेत सध्या सणाचा उत्साह आणि रंगत अनुभवायला मिळत आहे.
