पणजी बीएलओ बदलीच्या आदेशाला अखेर स्थगिती
तिसवाडी : पणजीतील 30 पैकी 28 बूथस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) बदलीच्या आदेशाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश काढून पुढील निर्देश येईपर्यंत स्थगिती दिल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. दै. तरुण भारतने याप्रकरणी वृत्त प्रसिद्ध करुन आवाज उठविला होता. 17 मे 2025 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश काढून पणजीतील 30 पैकी 28 बीएलओ बदलण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. परंतु यात राजकीय हस्तक्षेप असून पणजीचे आमदार हेच महसूलमंत्री असल्याने हे खटाटोप राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप करत एल्विस गोम्स यांनी भारतीय निवडणूक आयोगात तक्रार केली होती. मात्र अनेक तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने गोम्स यांनी अखेर पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीत नेपाळी आणि परप्रांतीय मतदार जोडून निवडणूक जिंकण्यासाठी या बदल्या केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाचे आभार व्यक्त करतो, हा गोमंतकीय जनतेचा विजयी आहे. तसेच बीएलओ बदलण्याची प्रक्रिया कोणाच्या इशाऱ्यावरून झाली, याची सखोल चौकशी व्हावी, कारण अचानक उठून 30 पैकी 28 बीएलओ बदलण्याची सुपीक राजकीय युक्ती कोणाची आहे, याची माहिती जनतेला कळली पाहिजे, असे काँग्रेस नेते एल्विस गोम्स म्हणाले.