Cultural Kolhapur: विस्मरणात चाललेली प्रथा पानसुपारीची
पानसुपारीचे निमंत्रण म्हणजे अभिमानाची गोष्ट असायची
By : प्रसन्न मालेकर
कोल्हापूर : अलीकडे अस्तंगत झालेली पण सध्याही हवीहवीशी वाटणारी पानसुपारी एक चांगली आणि सुदृढ लोकमानस बनवणारी प्रथा. घरोघरी महिलांसाठी हळदीकुंकू सोहळा तर बाहेर सोप्यामध्ये पुरुषांसाठी पानसुपारीचे आयोजन केले जायचे. पानसुपारीचे निमंत्रण म्हणजे अभिमानाची गोष्ट असायची.
त्यामुळे अनेकजण या समारंभाला आवर्जुन उपस्थित रहात. आचारविचारांचे देवाणघेवाण होई आणि मनातली आढीही निघून जाई, अशी ही प्रथा. कुठल्याही शुभ प्रसंगी महिलांसाठी हळदीकुंकवाचे आयोजन केले जाते. हळदीकुंकू म्हटलं की महिलावर्ग कोणताही किंतुपरंतु न ठेवता हळदीकुंकवाला हजेरी लावत असतो.
हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण नाकारणे हे शिष्टसंमत मानले जात नाही त्यामुळे अनेकदा राजकीय लोकसुद्धा महिलांची गर्दी जमवण्यासाठी या विधीचा आश्रय घेत असतात. हा हळदीकुंकू सोहळा नेहमीच पुरुषांसाठी चेष्टेचा विषय मानला जातो. गेल्या काही वर्षात गमतीने असाही प्रश्न विचारला जातो जर स्त्रियांसाठी हळदीकुंकू तर पुरुषांसाठी काय? तर याचे उत्तर पूर्वापार परंपरेने आपल्याकडे चालत आलेलं आहे.
फक्त आपण आता ते विसरलो आहोत इतकंच. पूर्वीच्या काळी जिथे जिथे महिलांना हळदीकुंकवासाठी म्हणून आमंत्रण असायचं. अशाच वेळेला बाहेरच्या सोप्यात पुरुषांसाठी समांतर पानसुपारीचे कार्यक्रम आयोजित केले जायचे. अपवाद फक्त चैत्र गौरी किंवा ज्येष्ठा गौरी असे महिलांचे विधी.
अन्यथा लग्नातसुद्धा आलेल्या पाहुण्यांना पानसुपारी, पेढा देऊन स्वागत करण्याची जुनी पद्धत आहे. म्हणूनच आता लग्न मंडपात प्रवेश करतानाच येणाऱ्या प्रत्येकाला पानसुपारी, फुल आणि पेढा दिला जातो. वास्तविक हे पानसुपारीच्या प्रथेचे रूप आहे.
गणेशोत्सव मंडळांचीही असे पानसुपारी
गणपतीच्या दिवसात पूर्वी अनेकांकडे पानसुपारीचे आयोजन केले जायचे. यानिमित्ताने घरी आलेल्या गृहस्थांना गंध, पानसुपारी, एखादं फुलं आणि पेढा देऊन स्वागत केलं जायचं. हौशी मंडळी असतील तर अत्तरही दिले जायचे किंवा गुलाबदाणीतून गुलाब जल शिंपडलं जायचं. परंतु कालांतराने ही पानसुपारीची प्रथा अथवा पद्धत हळूहळू अस्तंगत होत गेली.
याचबरोबर कोल्हापुरात आणखी एक सुंदर परंपरा होती, ती म्हणजे सार्वजनिक पानसुपारीची. गणेशोत्सव काळामध्ये वेगवेगळी मंडळ आपापल्या मंडळांमध्ये पानसुपारीचे आयोजन करत आणि आपल्या परिसरातील इतर मंडळांना आमंत्रण देत. बाकीचे आमंत्रितसुद्धा अशा पानसुपारीला जाणं हे अभिमानाचे लक्षण मानत.
त्यामुळे मोठ्या घोळक्याने या पानसुपारीला जाणे, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्या. आपापल्या सायकलीवरून, क्वचित प्रसंगी भाड्याच्या घेऊन तरुण मंडळाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी पानसुपारीला जात. मंडळातल्या ज्येष्ठ सदस्याकडे नारळ, पानसुपारी घेऊन पुढच्या मंडळाकडे मार्गस्थ होत. यानिमित्ताने मंडळातला स्नेहभाव जपला जात असे.
वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या तालीम संस्था या फुटबॉलच्या किंवा अन्य खेळाच्या मैदानावर प्रतिस्पर्धी मानल्या जात असल्यातरी अशा सोहळ्यांमुळे प्रतिस्पर्धेतली इर्षेची भावना कमी होऊन मैत्रीची भावना वाढायला कारण ठरत असे. बदलत चाललेलं वातावरण बघता ही विस्मरणात चाललेली पानसुपारीची पद्धत पुन्हा एकदा आवर्जून सुरू व्हावी असं वाटत