पामेला अँडरसनला मिळणार पुरस्कार
द लास्ट शोगर्लसाठी होणार गौरव
कॅनेडियन अभिनेत्री पामेला अँडरसनला तिच्या बहुमुखी प्रतिभेसाठी 20 व्या झ्यूरिच फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन आय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यादरम्यान अँडरसनचा चित्रपट ‘द लास्ट शोगर्ल’चे सादरीकरण केले जाणार आहे.
या चित्रपटाचा टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जिया कोपोला यांनी केले आहे. या चित्रपटात अँडरसनने 50 वर्षीय शोगर्ल ‘शेली’ची भूमिका साकारली आहे.
पामेलाने ही व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. तिने स्वत:च्या चेहऱ्याच्या हावभावाद्वारे शेलीच्या व्यक्तिरेखेला पडद्यावर जणू जिवंत केले आहे. तिचा अभिनय तिच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असून याकरता ऑस्कर तिला मिळू शकतो असे दिग्दर्शक जिया कोपोला यांनी म्हटले आहे. द लास्ट शोगर्ल या चित्रपटात जेमी ली कर्टिस यांनीही भूमिका साकारली आहे. चित्रपटात बिली लौर्ड देखील शेलीपासून वेगळी झालेली मुलगी हन्नाच्या रुपात दिसून येणार आहे. तसेच कीरन शिपका आणि ब्रेंडा सॉन्ग देखील या चित्रपटात भूमिका साकारत आहेत.
यंदाच्या झ्यूरिच चित्रपट महोत्सवात एलिसिया विकेंडर आणि केट विन्स्लेट समवेत अनेक दिग्गज कलाकारांना गौरविण्यात येणार आहे. 20 वा झ्यूरिच चित्रपट महोत्सव 3 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.