Vari Pandharichi 2025: पालखी रथ, ओढण्यासाठी खिल्लार बैलांची निवड, मान फक्त आळंदी गावालाच
पांढरेशुभ्र आणि धिप्पाड असणाऱ्या बैलांचीच निवड रथ ओढण्यासाठी केली जाते
पुणे : आषाढी वारीमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज या मुख्य पालख्यांचे रथ हे खिल्लारी बैलजोडीने ओढले जातात. लांबचा प्रवास असल्याने मोठे घाट, दरीचे रस्ते पार करण्यासाठी खिल्लार जातीच्याच बैलांची निवड केली जाते. दिसायला देखणे आणि पांढरेशुभ्र आणि धिप्पाड असणाऱ्या बैलांचीच निवड रथ ओढण्यासाठी केली जाते.
बैलांची निवड करण्यासाठी एक स्वतंत्र टीम काम करते. याचबरोबर पालखी मार्गात बैलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील असते. माऊलींच्या पालखी सोहळ्यात बैलजोडी देण्याचा मान हा फक्त आळंदी गावातील कुटुंबाला आहे.
आळंदी सोडून बाहेरच्या ग्रामस्थांना हा मान आजवर दिलेला नाही. पालखी रथ आळंदीहून पंढरपूरला जाताना 18 दिवसांचा प्रवास असतो. यामध्ये फक्त दोन खिल्लार बैलांची जोडीच संपूर्ण प्रवास सुरू करते. आणि परतीच्या वारीला देखील तीच जोडी पालखी रथ पंढरपूर ते आळंदी घेऊन येते. परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून आळंदी येथे आणली जातो.
दरम्यान, तुकाराम यांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीच्या मानासाठी अर्ज करू शकत होते. यामध्ये रितसर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लार बैलांची निवड करायची. दरवर्षी दोन वेगवेगळ्या कुटुंबांना हा मान दिला जात होता.
दोन कुटुंबाला मान दिल्यामुळे पहिल्या दिवशी एका कुटुंबांचे बैल पालखी रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैलं रथ ओढायची. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या जोडीला एक दिवस आराम भेटायचा. मात्र यावर्षी पासून देहू संस्थानने बैलजोडी खरेदी केली असून देहू संस्थानची बैलजोडी रथ ओढत आहे.