Kolhapur News : ओढ्यावरील रेणुकादेवी मंदिरात आज रात्री पालखी सोहळा
रेणुकादेवी मंदिरात पौर्णिमेनिमित्त धार्मिक सोहळ्यांची रेलचेल
कोल्हापूर : पौर्णिमेनिमित्त बुधवार ३ रोजी यल्लामाच्या ओढ्यावरील रेणुकादेवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत. यानिमित्त मंदिराच्या वतीने रात्री ८ वाजता पारंपरिक पद्धतीने रेणुकादेवीचा पालखी सोहळा साजरा केला जाईल. तसेच नऊच्या सुमारास कंकण विमोचन सोहळा आयोजित केला जाईल.
दरम्यान, पौर्णिमेनिमित्त पहाटेच्यासुमारास रेणुका मंदिरातील देवीच्या मूर्तीला अभिषेक करुन तिची भरपूजा बांधली जाईल. या पूजेचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी रांगेने मंदिरात सोडण्यात येईल. त्यासाठी रेणुका मंदिर आंबील यात्रा व उत्सव समितीचे कार्यकर्ते परिश्रम घेतील.
दुपारी ४ वाजता रेणुकादेवीला पुन्हा अभिषेक करुन तिची पांढऱ्या साडीने महापूजा बांधण्यात येईल. तसेच रात्री आठ वाजता रेणुकादेवीचा पालखी सोहळा साजरा केला जाईल. ही पालखी रेणुकादेवी मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून पालखी थेट कंकण बिमोचन सोहळ्यासाठी रेणुकादेवी मंदिर परिसरातील जमदग्नी ऋषी मंदिराकडे प्रयाण करेल.
या मंदिरात शेकडो महिला आपल्या हातातील काकणे फोडण्याचा म्हणजेच कंकण विमोचनचा विधी करतील. यानंतर काकणांचे तुकडे मंदिरातील होमाला अर्पण केले जातील. मंदिरातील अन्य धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर रेणुकादेवीची पालखी मंदिरात दाखल होईल.