Ratnagiri Crime News: पालीतही भरदिवसा 4 लाखाची घरफोडी, चोरीच्या सत्रामुळे ग्रामस्थांत भिती
बंद घरातील दहा तोळे सोन्याचे दागिने, रोकड लांबवली
पाली : तालुक्यातील हातखंब्यापाठोपाठ पाली बाजारपेठेलगत असणाऱ्या मराठवाडी येथे भरदिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी कपाटातील दहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 88 हजार 75 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. महामार्गालगतच्या घरांमध्ये चोरीच्या सत्रामुळे पालीसह विभागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही घटना 19 रोजी सायंकाळी 5.35 ते 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मराठवाडीमधील रमेश मधुकर सावंत यांच्या बंद घराचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.
घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. यामध्ये मंगळसूत्र 29 ग्रॅम, बांगड्या 40 ग्रॅम, सोनसाखळी 8.5 ग्रॅम, डूल 1.7 ग्रॅम, हार 10 ग्रॅम, कानवेल 1 ग्रॅम, सोन्याचा टॉप 4 ग्रॅम, सोनसाखळी 2 ग्रॅम असे जवळपास 10 तोळे सोन्याचे दागिने, 3,500 रुपये असे 4 लाख 88 हजार 75 ऊपयांचा मुद्देमाल लंपास केला.
सावंत हे रिक्षा व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा व पत्नी कामानिमित्त घराबाहेर गेलेले असतानाच ही चोरी झाली. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पाली पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक मोहन कांबळे, महिला हेडकॉन्स्टेबल तृप्ती सावंतदेसाई, हेडकॉन्स्टेबल उदय बांगर, कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील, दर्शना शिंदे याचबरोबर फॉरेन्सिक विभागाची टीम,श्वान पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या चोरीची फिर्याद रमेश मधुकर सावंत यांनी दिली असून गुह्याची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे करीत आहेत.