पॅलेस्टाइन अध्यक्षांकडून हमासला श्वानाच्या पिल्लाची उपमा
ओलिसांची मुक्तता करा, इस्रायल युद्ध थांबवेल : हमासला केली सूचना
वृत्तसंस्था/रामल्ला
पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी हमासला ‘श्वानाच्या पिल्लाची’ उपमा दिली आहे. हमासने ओलिसांची मुक्तता करावी, जेणेकरून इस्रायलला गाझामध्ये युद्ध सुरू ठेवण्यासाठी निमित्त मिळणार नाही असे अब्बास यांनी रामल्ला येथील स्वत:च्या भाषणात म्हटले आहे. गाझामध्ये नरसंहार रोखणे पहिली प्राथमिकता आहे. हा नरसंहार रोखला जावा, दरदिनी शेकडो लोक मारले जात आहेत. हमासने शस्त्रास्त्रs खाली ठेवत राजकीय पक्ष व्हावे आणि गाझाचे नियंत्रण पॅलेस्टिनी प्राधिकरणाला सोपवावे असे अब्बास यांनी पॅलेस्टाइन अथॉरिटीच्या सेंट्रल कौन्सिलच्या बैठकीत बोलताना म्हटले आहे. हमासने 2007 मध्ये अब्बास यांच्या फतह पक्षाला पराभूत करत गाझावर नियंत्रण मिळविले होते.
..तोवर अन्नाचा कणही पोहोचू देणार नाही
इस्रायलच्या नागरिकांची जोवर मुक्तता केली जात नाही तोवर गाझामध्ये अन्नाचा कणही पोहोचू दिला जाणार नाही. याप्रकरणी इस्रायलचे धोरण अत्यंत स्पष्ट असल्याचे इस्रायलचे संरक्षणमंत्री काट्ज यांनी सांगितले आहे. इस्रायलने गाझापट्टीत सर्व मानवीय सहाय्यावर (अन्न, पाणी, औषधे, इंधन) बंदी घातली आहे. ही नाकाबंदी 2 मार्च रोजी सुरु झाली होती. इस्रायलने हमासवर ओलिसांच्या मुक्ततेसाठी दबाव निर्माण करण्याकरता हे पाऊल उचलले होते.
स्थिती अत्यंत खराब
मेडिसिन्स सॅन्स फ्रंटियर्सने गाझाला ‘पॅलेस्टिनींसाठी सामूहिक दफनभूमी’ ठरविले आहे. मागील 18 महिन्यांमध्ये ही सर्वात खराब स्थिती आहे. मूलभूत गरजा देखील पूर्ण होत नसून हल्ले पुन्हा सुरू झाल्याचे मेडिकल एड फॉर पॅलेस्टाइन्सचे संचालक महमूद शलाबी यांनी म्हटले आहे. गाझामध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत 51 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले असून यात महिला आणि मुलांचे प्रमाण निम्मे आहे. 18 मार्च रोजी शस्त्रसंधी संपुष्टात आल्यापासून आणखी 1600 जणांचा मृत्यू झाला आहे.
गाझा शहराला घेरले
इस्रायलने गाझाच्या राफा शहराचा उर्वरित गाझाशी असलेला संपर्क तोडला आहे. संरक्षणमंत्री इस्रायल काट्ज यांनी याची पुष्टी दिली आहे. इस्रायली डिफेन्स फोर्सने मोराग कॉरिडॉरवर कब्जा केल्याने राफाचा गाझापट्टीसोबतचा संपर्क तुटला आहे. मोराग कॉरिडॉर दक्षिण गाझामधील एक मार्गा आहे. हमासला पळवून लावण्याची आणि सर्व ओलिसांची मुक्तता करत युद्ध संपुष्टात आणण्याची ही अंतिम संधी आहे. असे न घडल्यास हे सर्व गाझाच्या इतर भागांमध्येही होणार असल्याचे काट्ज म्हणाले.
राफावर इस्रायलचे नियंत्रण
राफा शहराला आता ‘इस्रायली सिक्युरिटी झोन’मध्ये बदलण्यात आले आहे. इस्रायली सिक्युरिटी झोनचा अर्थ इस्रायल स्वत:च्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक मानत असलेले स्थळ असा होतो. राफा क्रॉसिंग, फिलाडेल्फी कॉरिडॉर, वेस्टक बँकेचे काही भाग आणि गोलान हाइट्स इस्रायली सिक्युरिटी झोनच्या अंतर्गत येतात. या भागांमध्ये सैन्याद्वारे नियंत्रण ठेवले जाते. गाझाला दोन हिस्स्यांमध्ये विभागणाऱ्या नेत्जारिम कॉरिडॉरचा विस्तार केला जाणार असल्याचे काट्ज यांनी सांगितले आहे.