For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : जोतिबावर परंपरेनुसार खंडेनवमीला आज प्रथम पालखी सोहळा!

02:41 PM Oct 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur news   जोतिबावर परंपरेनुसार खंडेनवमीला आज प्रथम पालखी सोहळा
Advertisement

         नवमीला जोतिबा डोंगरावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Advertisement

जोतिबा डोंगर - दख्खनचा राजा जोतिबा डोंगर येथे नवरात्रोत्सवातील नवमीला मंगळवारी असंख्य भाविकांनी गर्दी केली. भाविकांनी श्रींस महाभिषेक, महापोशाख, धार्मिक विधी करून श्री चरणी तेल, नारळ, कडाकणी, ऊस, गुलाल, ववणा, फळे, फुले वाहिली. ख्खननगरीत बुधवारी १ ऑक्टोंबर रोजी खंडेनवमीस प्रथम पालखी सोहळा निघणार आहे. यावेळी श्रींस महाभिषेक, महापोशाख, विवे ओवाळणे, घट उठवणे, शस्त्र पुजन, धुपारती सोहळा होणार आहे.

दरम्यान, जोतिबा डोंगर येथे जागर सोहळ्यानिमित्त मंदिर रात्रभर सुरू असल्याने यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शन घेतले. आतापर्यंत नवरात्रोत्सवामध्ये नऊ लाखांहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले आहे. नवरात्रोत्सवामध्ये आष्टा (ता. वाळवा) येथील चव्हाण परिवाराने नंदी, महादेव, चोपडाई, जोतिबा व काळभैरव यमाई दत्त रामलिंग मंदिरातील कमानी आकर्षक फुलांनी सजवल्या आहेत. चव्हाण परिवाराने केलेली फुलांची सजावट आकर्षण ठरली.

Advertisement

यंदा आमदार डॉ. विनय कोरे यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबासाठी खास दुबईहून ड्राय गुलाबाचे फुले आणले आहे. पाच वर्षे हे फुल टवटवीत राहते. जोतिबादेवांच्या विजयदशमीच्या पुजेला देवाच्या हातामध्ये देण्यासाठी फुल आणले आहे. त्यामुळे या फुलाविषयी उत्सुकता आहे.

नवरात्रोत्सवात मंगळवारी जोतिबाची कमलपुष्प पाकळ्यांमधील राजेशाही थाटातील सुवर्णालंकारित आकर्षक महापुजा बांधली होती. ती श्रींचे पुजारी भाऊसो लादे, बाबासो लादे, सायबू भंडारे, देवराज बनकर, अंकुश दादर्णे, दगडू भंडारे, गणेश झुगर, विजय भंडारे, ओमकार लादे, गणेश दादर्णे, प्रवीण कापरे, गणेश बुणे, अजितभंडारे, उमेश शिंगे, निलेश झुगर, नानासाहेब लादे, प्रकाश सांगळे, हरिदास सातार्डेकर, गजानन लादे, रमेश ठाकरे, महादेव झुगर यांनी बांधली.

काळभैरव यमाई, चोपडाई, महादेव, नंदीदेवांची महापूजा केदार चिखलकर,सरदार सांगळे, केदार शिंगे स्वप्निल दादर्णे, तुषार झुगर, हर्षद बुणे, कैलास ठाकरे, सतीश मिटके, अजित बुणे, सौरभ सांगळे, जयदिप आमाणे, सुमित भिवदणे, रोहन सांगळे, रामचंद्र बुणे यांनी बांधली.

दरम्यान, मंगळवारी पहाटे ३ वाजता घंटानाद करून 'श्री"च्या मंदिराचे दरवाजे उघडून 'श्री" सह सर्व देवाची पाद्यपुजा, काकडआरती, महाअभिषेक, महापोषाख व धार्मिक विधी करुन महानैवेद्य दाखवला. सकाळी दहा वाजता धुपारती लवाजमा सोहळा यमाईकडे गेला, तेथे विधी करून सोहळा श्रींच्या मंदिरात आला, यावेळी तोफेची सलामी देण्यात आली.

त्यानंतर त्रिकाळ आरती करून अंगारा वाटप करण्यात आला. दरम्यान मंगळवारी कोल्हापूरच्या अंबाबाईचा जागर असल्यामुळे भाविक जोतिबाचे दर्शन घेऊन अंबाबाईच्या दर्शनासाठी परतत होते. त्यामुळे कोल्हापूर जोतिबा मार्गावर वाहतुकीची कोंडी दिसून येत आहे.

-


Advertisement
Tags :

.