अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा ‘स्ट्राईक’
28 दहशतवादी मारल्याचा दावा, सूड घेण्याची प्रतिज्ञा
► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
अफगाणिस्तानच्या तीन ठिकाणांवर वायुहल्ला केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. या हल्ल्यामध्ये 28 दहशतवाद्यांना मारण्यात आले आहे, असेही पाकिस्तानचे म्हणणे आहे. तथापि, पाकिस्तानने नागरी वस्त्यांवर हल्ला करुन निरपराध नागरिकांची हत्या केली आहे, असा पलटवार अफगाणिस्तानने केली आहे. तसेच, या हल्ल्याचा सूड उगविला जाईल, असाही इशारा त्याने दिला आहे.
सोमवारी पाकिस्तानच्या युद्ध विमानांनी अफगाणिस्तानला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ असलेल्या तीन स्थानांवर मोठी बाँबफेक केली. या स्थानी दहशतवादी लपलेले होते. या कारणास्तव हा हल्ला करण्यात आला, असा बचाव पाकिस्तानने केला आहे. तथापि, मारल्या गेलेल्यांमध्ये कोणीही दहशतवादी नसून सर्वसामान्य नागरिक, महिला आणि मुले होती, असे अफगाणिस्तानचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी वायव्य पाकिस्तानातील एका पोलीस स्थानकावर अफगाणिस्तानातील बंडखोरांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात काही पोलीस आणि सैनिक मारले गेले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने हा वायुहल्ला केला, असेही पाकिस्तानच्या प्रशासनाने सोमवारी प्रतिपादन केले आहे.
आधीही झालेत हल्ले
जुलै 2026 मध्ये अफगाणिस्ताननेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले होते, अशी माहिती दिली जाते. मात्र, हे सर्व ड्रोन्स आकाशातच निकामी करण्यात आले होते, असे पाकिस्तानचे म्हणणे होते. त्याआधी मार्चमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्ताची राजधानी काबूलवर हल्ला केला होता. तो आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला मानण्यात येतो. त्या हल्ल्यात 400 हून अधिक जण ठार झाले होते. त्यांच्यापैकी बहुतेकजण नागरिक होते. महिला आणि मुलेही मोठ्या प्रमाणार मारली गेली होती.
सैनिकी शक्तीत मोठा फरक
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सैनिकी शक्तींमध्ये मोठे अंतर आहे. पाकिस्तानच्या वायुदलापाशी 422 युद्ध विमाने आणि 260 हेलिकॉप्टर्स आहेत. तथापि, अधिकृतरित्या अफगाणिस्तानच्या जवळ एकही युद्ध विमान नाही. तसेच, हेलिकॉप्टर्सही नाहीत. मात्र, अनधिकृत वृत्तांच्या अनुसार अफगाणिस्तानजवळ 6 युद्ध विमाने, 23 हेलिकॉप्टर्स आणि काही ड्रोन्स आहेत. अफगाणिस्तानने काही ड्रोन्स पाकिस्तानच्या विरोधात उपयोगात आणले आहेत. दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठा तणाव असून त्याचे रुपांतर कधी कधी संघर्षात होते.