पाकिस्तानची दैना
बलुचिस्तान प्रांतात घडलेल्या रेल्वे अपहरणाने पाकिस्तानच्या प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे. नेहमी दहशतवादाचे हत्यार उपसून भारताला छळण्याचा प्रयत्न करणारा हा देश आता स्वत:च बंडखोरी आणि हिंसाचाराची शिकार कसा बनला आहे, हे या अपहरणाने सिद्ध केले. या अपहरणकांडात पाकिस्तानच्या 30 हून अधिक सैनिकांची हत्या करण्यात आली. हे अपहरण कांड संपुष्टात आणल्याचा दावा जरी पाकिस्तान करत असला, तरी अद्यापही त्या देशाचे 100 हून अधिक सैनिक बलोच बंडखोरांच्या ताब्यात आहेत, असे अनधिकृत वृत्त आहे. या संबंधात नेमकी परिस्थिती काय आहे, हे समजण्यास मार्ग नाही. कारण पाकिस्तानच्या प्रशासनाची प्रतिष्ठा या प्रकरणात पणाला लागल्याने तो देश खरी परिस्थिती जगासमोर मांडेल, याची शाश्वती नाही. बलुचिस्तान ही पाकिस्तानची, त्याच्या स्वातंत्र्यापासून दुखरी नस राहिला आहे. 1947 मध्ये त्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा बलुचिस्तानच्या नेत्यांनी पाकिस्तानात समाविष्ट होण्यास नकार दिला होता. त्यांना भारतात समाविष्ट व्हायचे होते. तथापि, आपल्या त्यावेळच्या नेत्यांनी हा प्रस्ताव धुडकाविला होता. बलुचिस्तान आणि भारत यांच्यात भौगोलिक सलग्नता नाही, असे त्यांचे म्हणणे होते. (वास्तविक त्यावेळी पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान, म्हणजेच सध्याचा बांगला देश यांच्यातही भौगोलिक सलग्नता नव्हती. तथापि, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान हे एकच राष्ट्र आहे, असे त्यावेळी आपल्या नेहरु आदी नेत्यांना मान्य होते. पण तेच सूत्र बलुचिस्तानला लावण्यास मात्र यांचा नकार होता.) अशा अनाठायी अतिउदारपणामुळे त्यावेळी भारताची जी प्रचंड हानी झाली, तिची किंमत आजही आपण भोगत आहोत, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे बलुचिस्तानचा समावेश पाकिस्तानात त्या देशातील लोकांच्या इच्छेविरुद्ध सक्तीने करण्यात आला होता. तेव्हापासूनच त्या भागात पाकिस्तानविरोधी भावना तीव्र प्रमाणात आहेत. पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची त्यांची इच्छा असून त्यासंदर्भात तेथील जनतेकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत असून त्याचे क्षेत्रफळ पाकिस्तानच्या क्षेत्रफळाच्या 44 टक्के इतके आहे. लोकसंख्या मात्र केवळ 1 कोटी 90 लाख इतकी आहे. या लोकसंख्येपैकी केवळ 70 लाख लोक मूळचे बलोच आहेत. इतर लोक पाकिस्तानच्या प्रशासनाने तेथे इतर प्रांतांमधून नंतर आणून वसविलेले आहेत. अशा प्रकारे मूळ बलोच लोकांची संख्या कमी केली तर त्यांची बंडखोरी निष्प्रभ होईल अशी पाकिस्तानच्या प्रशासनाची अटकळ होती. पण तसे झालेले नाही. बलोच लोकांना त्यांच्याच भूभागात अल्पसंख्य बनविण्यात आले असले तरी, त्यांची शक्ती कमी झालेली नाही, हे त्या भागात सातत्याने घडणाऱ्या पाकिस्तानविरोधी कारवायांमुळे दिसून येते. रेल्वेचे हे अपहरण बलोच लिबरेशन आर्मी या संघटनेने घडविले. बलोच लोकांच्या अशा अनेक संघटना त्या भागात आहेत. त्यांच्याकडून नेहमी पाकिस्तानविरोधी कारवाया केल्या जातात. पाकिस्तान आपल्या लष्करी बळाचा पाशवी उपयोग करुन बलोच लोकांना चिरडण्याचा प्रयत्न करते. पाकिस्तान प्रशासनाने आजवर बलुचिस्तानातील हजारो बलुची युवकांची अपहरणे केली आहेत. या युवकांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असावी, असे मानण्यात येते. याशिवाय पाकिस्तानच्या प्रशासनाने या भागात इतर अनेक प्रकारे बलोच लोकांवर अत्याचार आणि अन्याय केले आहेत. अनेकदा या अत्याचारांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाजही उठविण्यात आला आहे. आता या भागातील स्थिती पाकिस्तानच्या हाताबाहेर गेली आहे काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. कारण, बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यातच जमा आहे, अशी वक्तव्ये पाकिस्तानच्या संसदेत तेथील लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली आहेत. आज पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याचे दिसून येते. त्यामुळे बलुचिस्तान किंवा अफगाणिस्तानच्या सीमेनजीक घडणारी बंडखोरी पूर्णत: निपटून काढण्याइतकी ताकद त्या देशाकडे राहिली नसल्याचे काही तज्ञांचे मत आहे. कायदेशीरदृष्ट्या भारताचा असलेल्या काश्मीर भागाला भारतापासून तोडणे हे आपले ध्येय मानणाऱ्या पाकिस्तानला आज बलुचिस्तान स्वत:कडे राखताना नाकी नऊ येत आहेत, हा काळाने उगवलेला सूडच म्हणावा लागेल. निम्मा काश्मीर पाकिस्तानने बळकावलेला आहेच. उरलेलाही भारताकडून हिसकावण्याचे त्याचे प्रयत्न चालूच आहेत. काश्मीरमध्ये आज भारत सरकारच्या सातत्यपूर्ण आणि संयमित प्रयत्नांमुळे परिस्थिती सुधारत आहे. काश्मीरच्या जनतेत भारतापासून आपण वेगळे आहोत, ही भावना निर्माण करणारा अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्यात आल्यापासून तेथे तुलनेने मोठ्या प्रमाणात शांतता आहे. लोकशाहीच्या पद्धतीने निवडणुकाही झाल्या असून लोकनियुक्त सरकार सत्तेवर आले आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये झाले नव्हते, तेव्हढ्या मोठ्या प्रमाणात मतदान जम्मू-काश्मीरमध्ये झाले. तेथील पारंपरिक पर्यटन आदी व्यवसाय आता पुन्हा बहरलेले आहेत. पाकिस्तानला ही शांतता बघवत नसल्याने त्याच्याकडून हिंसाचार घडविण्याचे प्रयत्न चाललेले असतात. पण आता या प्रयत्नांना तेथील जनता दाद देत नाही, हे देखील स्पष्ट होत आहे. याचवेळी बलुचिस्तानात मात्र पाकिस्तानविरोधी बंडखोरीने उचल खाल्ली आहे. यातून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या प्रशासनांच्या गुणवत्तेतील अंतरही स्पष्ट होते. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये आश्चर्य वाटते ते आपल्या तथाकथित मानवाधिकारवाल्या नाटकी विचारवंतांचे. पॅलेस्टाईनच्या संदर्भात नाकाने कांदे सोलणारे हे दुढ्ढाचारी बलुचिस्तानात पाकिस्तानने चालविलेल्या अत्याचारांसंबंधी, किंवा सध्या बांगला देशात हिंदूंविरोधात चाललेल्या अन्यायाविषयी चकार शब्द उच्चारण्याचे धाडस दाखवत नाहीत. यावरुन त्यांचा दांभिकपणा उघडा पडतो आणि त्यांची विश्वासार्हताही कमी होते. तथापि, पाकिस्तानात जे चालले आहे, त्याला पाकिस्तान स्वत:च जबाबदार आहे, हे देखील सिद्ध होत आहे.