पाकिस्तानची अमेरिकेला विनवणी
ऑपरेशन सिंदूर रोखण्यासाठी अमेरिकेत 60 बैठका : लॉबिइंगवरून अमेरिकन सरकारच्या फाइल्सद्वारे खुलासा
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेच्या सरकारच्या फाइल्समधून ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या लॉबी एजेन्सींनी वॉशिंग्टनमध्ये जबरदस्त लॉबिइंग केले होते असे समोर आले आहे. अमेरिकेच्या सरकारच्या या फाइल्स अलिकडेच सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. यातून मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताच्या सैन्य कारवाईला रोखण्यासाठी पाकिस्तानच्या वतीने एजेन्सींनी ट्रम्प प्रशासनावर मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता असे उघड झाले आहे.
पाकिस्तानी राजनयिक आणि संरक्षण अधिकाऱ्यांनी एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे खासदार आणि माध्यम नेटवर्क्ससोबत 60 हून अधिक बैठका करण्याचा प्रयत्न केला होता. या बैठका पहलगाम हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूरदरम्यान आणि ऑपरेशन सिंदूर युद्धविरामानंतर करण्यात आल्या होत्या.
पाकिस्तानची लॉबी
अमेरिकन फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन अॅक्ट (एफएआरए) अंतर्गत फाइल करण्यात आलेल्या रिकॉर्डद्वारे याचा खुलासा झाला आहे. पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत आणि त्याचा डिफेन्स अताशेने इर्मल, फोन कॉल आणि आमने-सामनेच्या बैठकीद्वारे 60 हून अधिक अधिकारी आणि मध्यस्थांशी वारंवार संपर्क साधला होता असे यातून स्पष्ट होते. म्हणजेच पाकिस्तान भारताच्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात भयभीत झाला होता आणि सातत्याने भारतीय कारवाई रोखण्यासाठी अमेरिकेकडे विनवणी करत होता. पाकिस्तान भारताच्या कारवाईला रोखण्यासाठी अमेरिकेसमोर हात पसरत होता.
पाकिस्तानची धडपड
पाकिस्तानने हा संपर्क काँग्रेस (अमेरिकेची संसद), पेंटागॉन, विदेश विभाग आणि प्रख्यात अमेरिकन पत्रकारांशी साधला होता. यादरम्यान पाकिस्तानी प्रतिनिधींनी काश्मीर, क्षेत्रीय सुरक्षा, दुर्लभ खनिजे आणि पाकिस्तान-अमेरिका संबंधांवरून चर्चा केली होती. पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी प्रमुख अमेरिकन माध्यम संघटनांसोबत मुलाखती आणि बॅकग्राउंड बैठकाही केल्या. पाकिस्तान सातत्याने संपर्क साधत होता आणि ज्या अधिकाऱ्यांशी शक्य होईल, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता असे या फाइल्समधून समोर आले आहे.
5 दशलक्ष डॉलर्सचा करार
पाकिस्तानने ट्रम्प प्रशासनापर्यंत लवकर पोहोच निर्माण करणे आणि व्यापारी अन् मुत्सद्देगिरीचे संबंध तीव्र करण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये 6 लॉबिंग एजेन्सींची सेवा घेतली होती. पाकिस्तानने या एजेन्सींसोबत 5 दशलक्ष डॉलर्सचा करार केला होता. पाकिस्तानने जेवलिन अॅडव्हायर्ससोबत करार केला होता आणि या करारानंतरच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांना व्हाइट हाउसमध्ये आमंत्रित पेले होते असे मानले जाते. यासंबंधीचा खुलासा न्यूयॉर्क टाईम्सने नोव्हेंबर महिन्यात केला होता.