पाकिस्तानचे ‘मुस्लीम कार्ड’ अयशस्वी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दहशतवादाच्या मुद्द्यावर मलेशियाने भारताला समर्थन देऊ नये, म्हणून पाकिस्तानने केलेला प्रयत्न वाया गेला आहे. पाकिस्तानने मलेशियाला इस्लाम धर्माच्या नावाने हाक दिली होती. मलेशिया हे मुस्लीम राष्ट्र असल्याने त्याने पाकिस्तानसारख्या मुस्लीम देशाच्या बाजूने रहावे, असे आवाहन पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुत्तो यांनी केले होते. तथापि, मलेशियाने भुत्तो यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताचे समर्थन करण्याची भूमिका न सोडल्याने पाकिस्तानला निराश व्हावे लागले आहे.
भारताने गेल्या आठवड्यापासून विविध देशांमध्ये आपल्या खासदारांची प्रतिनिधीमंडळे पाठविली आहेत. या देशांना भारत पाकिस्तानविरोधातील आपली बाजू समजावून सांगत असून जगाच्या व्यासपीठावर पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी भारताने हे ‘ग्लोबल आऊटरीच’ अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत एका शिष्टमंडळाने मलेशियाचा दौराही केला आहे. तथापि, मलेशिया आणि पाकिस्तान हे दोन्ही इस्लामी देश असल्याने मलेशियाने भारताच्या शिष्टमंडळाची बाजू ऐकून घेऊ नये, असे आवाहन भुत्तो यांनी केले होते.
मलेशियाकडून समर्थन
तथापि, मलेशियाने पाकिस्तानलाच या संदर्भात सुनावले आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही भारतासह आहोत, असा स्पष्ट संदेश मलेशियाच्या प्रशासनाने भुत्तो यांना दिल्याने पाकिस्तानची मोठीच कोंडी झाली. मलेशियाच्या प्रशासनाने भारताच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन, बाजू समजून दिल्यासाठी भारताचे आभारही मानले आहेत. ज्यावेळी पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याची स्वतंत्र आणि त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्याची मागणी केली होती, त्यावेळी प्रथम मलेशियाने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भुत्तो यांनी मुस्लीम कार्ड खेळून या देशाला आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी झाला आहे. आपल्या ‘ग्लोबल आऊटरीच’ अभियानात भारताला मोठे यश मिळाले आहे.