दिल्ली स्फोटात पाकिस्तानचा हात
केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचा गंभीर आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सोमवारी दिल्लीत झालेल्या भीषण कार स्फोटात पाकिस्तानचा हात आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी केला आहे. या स्फोटाचे सूत्रधार कोठेही असले तरी त्यांना सोडले जाणार नाही. ‘सिंदूर’ अभियान अद्याप सुरु आहे, हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे, असा इशाराही यांनी बुधवारी दिला आहे.
भारताचे गृहमंत्रीपद अमित शाह यांच्यासारख्या सक्षम माणसाकडे आहे. त्यामुळे ते आणि त्यांचा विभाग दहशतवाद्यांना सैल सोडणार नाहीत. या स्फोटात पाकिस्तानचा हात आहे, ही बाब स्पष्ट आहे. नुकतीच मोठ्या प्रमाणात स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. भारतात स्फोट मालिका घडवून आणून हाहाकार निर्माण करण्याचे दहशतवाद्यांचे कारस्थान होते. तथापि, केंद्रीय गृहविभागाच्या सतर्कतेमुळे ते हाणून पाडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिल्ली स्फोटाच्या सूत्रधारांनाही शोधले जाणार आहे. भारतीय जनतेने या संदर्भात निश्चिंत रहावे. दहशतवादी सुटू शकणार नाहीत, असा विश्वास बिट्टू यांनी व्यक्त केला आहे.
युएपीएच्या अंतर्गत प्रकरण
दिल्ली स्फोटाची नोंद दिल्ली पोलिसांनी कठोर अशा बेकायदेशीर कृत्य विरोधी कायद्याच्या (युएपीए) अंतर्गत केली आहे. या स्फोटाची चौकशी वेगाने केली जात असून लवकरच सूत्रधारांना पकडण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संपूर्ण देशभरात सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्वाची स्थळे आणि शहरे यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
पाकिस्तानातील मृतांची संख्या 12
दिल्लीत स्फोट झाल्यानंतर तशाच प्रकारचा स्फोट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील एका न्यायालयाच्या परिसरात मंगळवारी दुपारी झाला होता. त्यातील मृतांची संख्या वाढून 12 झाली आहे. या स्फोटात भारताचा हात आहे, असा आरोप पाकिस्तानने केला होता. मात्र, भारताच्या परराष्ट्र विभागाने हा आरोप फेटाळला आहे, पाकिस्तानची ही नेहमीचीच सवय आहे. पाकिस्तानातील स्थिती त्या देशाच्या प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे आपले अपशय झाकण्यासाठी पाकिस्तान भारतावर हेत्वारोप करीत आहे. पाकिस्तानने आपल्या देशातील स्थिती नियंत्रणात आणावी, अशी टिप्पणीही भारताने केली आहे.