For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकचा ड्रामा, भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्कार घालण्याची धमकी

06:18 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकचा ड्रामा  भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्कार घालण्याची धमकी
Advertisement

आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये मोठ्या घडामोडी : बांगलादेशच्या समर्थनार्थ पाक बोर्डाचे नखरे

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई, कराची

आयसीसी टी-20 विश्वचषकाचा थरार 7 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. मात्र त्याआधी बांगलादेश आणि पाकिस्तान क्रिकेट संघाची चांगलीच चर्चा रंगली आहे. बांगलादेशला विश्वचषकातून बाहेर काढल्याचा राग मनात धरुन पाकिस्तान क्रिकेट  बोर्ड आता भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार करत असल्याचे संकेत पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी दिले आहेत. टी-20 वर्ल्डकपमधून पाकने माघार घेतल्यास आयसीसी बांगलादेशला पुन्हा एकदा संधी देण्याचा विचार करत आहे. दरम्यान, पीसीबीच्या आर्थिक कोंडीसह कारवाईचा बडगा उगारणार असल्याची माहिती आयसीसीमधील सूत्रांनी दिली आहे.

Advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीने बांगलादेशची हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विरोध करत टी-20 विश्वचषकातील भारतविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचीही भेट घेतली आहे. त्यांनी म्हटले होते की येत्या काही दिवसात सरकारकडून उत्तर मिळाल्यानंतर यासंदर्भात आता निर्णय घेतला जाईल. विशेष म्हणजे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत, याबाबत आधीच निर्णय झाला आहे. पण असे असतानाही जर पाकने स्वत:हून स्पर्धेवर बहिष्कार टाकला, तर मात्र त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

पाक बाहेर पडल्यास बांगलादेशला संधी?

यामुळे जर पाकिस्तानने टी-20 विश्वचषकातून माघार घेतल्यास बांगलादेशला आयसीसीकडून पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते. सुरुवातीला बांगलादेशला भारतात सामने खेळण्यास नकार दिल्याबद्दल स्पर्धेतून वगळण्यात आले होते आणि त्याच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला होता. आता, जर पाकिस्तानने माघार घेतली तर आयसीसी बांगलादेशला दुसरी संधी देऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, या परिस्थितीत बांगलादेश त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळेल.

पाकला जबर दणका बसणार

पाकिस्तानने जर भारताच्या विरोधात ग्रुप स्टेजचा सामना खेळण्यास नकार दिला, तर त्यांचे 2 गुण कापले जातील. तसेच, पीसीबीला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय, आयसीसीने पाकिस्तानला सर्व स्पर्धांमधून वगळण्याची योजनाही तयार केली आहे. त्यांच्या फ्रँचायझी स्पर्धा पाकिस्तान सुपर लीगला आयसीसीकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणेही कठीण होईल. दुसरीकडे, भारत-पाकिस्तान सामना न झाल्यामुळे आयसीसीला देखील आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते.

आयसीसीचा बांगलादेशी पत्रकारांना दणका

आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी बांगलादेशचे अनेक पत्रकार भारत आणि श्रीलंकेत येणार होते. त्यासाठी त्यांनी अर्ज भरलेही होते. मात्र बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतल्याचा फटका या पत्रकारांना बसला आहे. आयसीसीने बांगलादेशी क्रीडा पत्रकारांना अधिकृत मान्यता (वार्तांकनाची परवानगी) देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे बांगलादेशी पत्रकारांना स्पर्धेचे थेट कव्हरेज करता येणार नाही. बांगलादेशातून जवळपास दीडशे पत्रकारांनी टी-20 वर्ल्डकपचे वार्तांकन करण्यासाठी अर्ज भरले होते. मात्र त्यांच्यापैकी कोणालाच परवानगी मिळालेली नाही.

Advertisement

.