बलुचिस्तान हिंसाचाराबाबतचे पाकिस्तानचे आरोप बिनबुडाचे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमध्ये उफाळलेल्या हिंसाचारामागे भारताचे षडयंत्र असल्याचा पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. पाकिस्तानने स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी भारतावर आरोप करु नयेत, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.
बलूच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानमधील 14 शहरांमध्ये केलेल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यांमध्ये 84 पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी ठार झाले होते. तसेच त्यावेळी उफाळलेल्या हिंसाचारमध्ये 30 हून अधिक शासकीय कार्यालये अथवा स्थलसंपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच 23 वाहने जाळली होती. निर्वासित बलूच नेत्यांनी आणि सशस्त्र गटांनी या घटनेचे समर्थन केले आहे. या घटना भारताने फूस दिल्याने होत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. तथापि भारताने याचा स्पष्ट शब्दांमध्ये इन्कार केला आहे. पाकिस्तान आपली जबाबदारी झटकू पहात आहे. त्यांच्या अंतर्गत घटनांमध्ये भारताने कधीही हस्तक्षेप केलेला नाही. तुमची स्वत:चे अपयश लपवण्यासाठी भारतावर निराधार आरोप करत असल्याचे जयस्वाय यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर बलुचिस्तानमधील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्या, त्यांना योग्य सुविधा पुरवा, ज्या मागण्यांसाठी ते दीर्घकाळ लढा देत आहेत, त्याकडे लक्ष द्या, अशा सूचनाही केल्या आहेत.