पाकिस्तानी तरुण चुकून भारतीय हद्दीत
पाकिस्तानी रेंजर्सच्या विनंतीवरून बीएसएफने पाठवले माघारी
वृत्तसंस्था/ .अमृतसर
शुक्रवारी रात्री एक पाकिस्तानी नागरिक चुकून भारतीय हद्दीत घुसला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला परत पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात दिले आहे.
बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पाकिस्तानी नागरिक चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसला. जवानांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार तपास सुरू करण्यात आला.
सदर व्यक्तीने चुकून आणि कोणत्याही हेतूशिवाय सीमा ओलांडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर पाकिस्तान रेंजर्सशी संपर्क साधण्यात आला. नियमानुसार व्यक्तीची ओळख पटल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला माघारी पाठवण्याचा निर्णय घेतला. घुसखोरी करण्याच्या किंवा घातपात घडवण्याच्या उद्देशाने तो भारतीय हद्दीत न घुसल्यामुळे त्याला पुन्हा पाकिस्तानच्या हवाली करण्यात आले. तपास यंत्रणांनी त्याचे नाव आणि ओळख उघड केलेली नाही.