For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानी दहशतवाद्यांची काश्मीरमध्ये पुन्हा घुसखोरी

06:51 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानी दहशतवाद्यांची काश्मीरमध्ये पुन्हा घुसखोरी
Advertisement

परी नाला परिसरात चकमक-गोळीबार : राजौरीमध्ये हाय अलर्ट

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील राजौरीच्या परी नाला परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. शनिवार सकाळपासून अधूनमधून गोळीबार सुरू असल्यामुळे संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या परिसरात तीन ते चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचा संशय असून, सुरक्षा दलांनी त्यांना घेरले आहे.

Advertisement

राजौरीमधील परी नाला परिसरात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर, भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी या परिसरात संयुक्त शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तर दिल्यामुळे चकमक सुरू झाली.

डोंगराळ भागात शोधमोहीम सुरू

चकमकीनंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर सील केला असून, हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग रोखण्यासाठी घटनास्थळी अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. शोधमोहीम सुरू असून परिसराची सातत्याने तपासणी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणा आजूबाजूच्या जंगलांमध्ये आणि डोंगराळ भागांमध्येही दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

दहशतवादी शस्त्रसज्ज

घुसखोरी केलेले दहशतवादी मोठ्या प्रमाणात शस्त्रसज्ज आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली. जोपर्यंत ते जिवंत किंवा मृत पकडले जात नाहीत, तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहील. जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने जवळच्या गावातील लोकांना सतर्क राहण्याचा आणि घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे.

शनिवारी सायंकाळपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची पुष्टी झालेली नव्हती. हा परिसर घनदाट जंगल आणि डोंगराळ असल्याने दहशतवादी त्याचा फायदा घेऊ शकतात, त्यामुळे सैनिक अत्यंत सावधगिरीने कारवाई केली जात आहे. गेल्या काही महिन्यांत राजौरी-पूंछ पट्ट्यात झालेल्या अनेक दहशतवादी घटनांनंतर ही चकमक झाली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे.

Advertisement
Tags :

.