अल्पवयीन पाकिस्तानी युगुल सीमा ओलांडून भारतात दाखल
वृत्तसंस्था/कच्छ
गुजरातमधील कच्छ येथे एका पाकिस्तानी प्रेमी युगुलाला बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून भारतात प्रवेश करताना पकडण्यात आले. बुधवारी संध्याकाळी येथील ग्रामस्थांनी नजरेस एक जोडपे भारतीय सीमेत 40 किलोमीटर आतपर्यंत घुसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर यासंबंधीची माहिती तपास यंत्रणांना दिल्यानंतर सदर प्रेमी युगुलाला अटक करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चौकशीदरम्यान, दोन्ही अल्पवयीन प्रेमींनी पाकिस्तानातील इस्लामकोटमधील लासरी गावातील असल्याचे कबूल केले. त्यांना लग्न करायचे होते, परंतु त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या विवाहाला नकार दिल्याने ते भारतात आल्याचे मान्य केले.
कच्छ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन युगुलाकडे कोणतेही ओळखपत्र आढळले नाही. तथापि, चौकशीदरम्यान आपण इस्लामकोटमधील लासरी गावातील रहिवासी असल्याची माहिती त्यांनी दिली. ते मंगळवारी रात्री गाव सोडून पळून गेल्यानंतर वाळवंट ओलांडून 60 किलोमीटर अंतर पार करून भारतीय सीमेत शिरले. जेव्हा दोघे गुजरातमधील रतनपार गावाच्या सीमेवरील सांगवारी मंदिराजवळ पोहोचले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना पाहिले. त्यांना यापूर्वी कधीही गावाजवळ पाहिले नसल्यामुळे त्यांना संशय आला. ग्रामस्थांनी लगेचच यासंबंधीची माहिती खादिर पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर जोडप्याला घेत अधिक चौकशी सुरू केली आहे. सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यात आली. अटक करण्यात आलेल्या प्रेमी युगुलांपैकी मुलगा 16 वर्षांचा आणि मुलगी 15 वर्षांची असल्याचे खादिर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अजय सिंग झाला यांनी सांगितले.