कराचीत अमेरिकन दूतावासावर पाकिस्तानी निदर्शकांचा हल्ला
अमेरिकन सैन्याने केलेल्या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ कराची
खामेनेई यांच्या मृत्यूनंतरच्या निदर्शनांची आग पाकिस्तानात पसरली आहे. पाकिस्तानातील कराची येथे हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिकन दूतावासाच्या परिसराबाहेर जाळपोळ आणि तोडफोड करण्यात गुंतलेल्या जमावाने गर्दी केली. परिस्थिती चिघळत असताना अमेरिकन वाणिज्य दूतावासात तैनात असलेल्या अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला. कराचीसोबतच देशात इतरत्रही काही निदर्शक अमेरिकाविरोधी घोषणा देत इस्लामिक नेत्यांना संरक्षण देण्याची मागणी करत आहेत.
अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्युनंतरचा संताप पाकिस्तानात पसरला आहे. पाकिस्तानातील कराचीमध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत. अमेरिकन दुतावासासोबतच युएनच्या कार्यालयावरही संतप्त जमावाने हल्ला केला. जमावाने अमेरिकन दूतावासाच्या आवारात आग लावली आणि तोडफोड केली. पाकिस्तानी पोलिसांनी जमावाला आवरण्याचा प्रयत्न केल्यानंतरही काही लोक दुतावासात घुसल्यानंतर तेथे तैनात अमेरिकन सैनिकांनी गोळीबार केल्याने 12 लोकांना प्राणास मुकावे लागले.
कराचीमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर रविवारी सकाळीच मोठ्या संख्येने निदर्शक जमल्यानंतर गोळीबार आणि संघर्षाची घटना घडली. इराणमध्ये अयातुल्ला खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केल्याबद्दल निदर्शक आपला राग व्यक्त करताना दिसून येत होते. निदर्शकांनी दूतावासाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच सुरक्षा जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे तैनात असलेल्या पोलीस आणि अमेरिकन सुरक्षा दलांनी प्रथम अश्रुधुराच्या मोठ्या गोळ्या झाडल्या आणि नंतर गोळीबारही केला. या हिंसाचारात 30 हून अधिक जण जखमीही झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. या तणावानंतर संपूर्ण परिसर छावणीत बदलण्यात आला असून मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.