पाकची खुमखुमी
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असिम मुनीर यांनी अमेरिका दौऱ्यात भारताविरोधात दिलेली अण्वस्त्रयुद्धाची धमकी म्हणजे ‘मूळ स्वभाव जाईना,’ असाच प्रकार म्हणता येईल. 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. तर त्याआधी एक दिवस म्हणजे 14 ऑगस्टला पाकला स्वातंत्र्य मिळाले. यंदा दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 78 वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत भारताने देशाच्या कृषी, अवकाश, विज्ञान तंत्रज्ञान, आर्थिकसह सर्वच क्षेत्रात मोठी मजल मारली. जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक सत्ता होण्याच्या दिशेने देश मजबुतीने वाटचाल करताना दिसतो. पंडित नेहरू यांच्यापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी देशाचे नेतृत्व केले. अनेक पक्षांची सरकारे आली आणि गेली. मात्र, देशाचा सर्वांगीण विकास आणि जनहित हाच प्रामुख्याने भारताचा फोकस राहिला. मुख्य म्हणजे अनेक स्थित्यंतरांमध्येही येथील लोकशाही व्यवस्था अबाधित राहिली. दुर्दैवाने पाकिस्तानच्या नेतृत्वाने मात्र देशनिर्मितीपासूनच भारतद्वेष जोपासला आणि वाढवला. देशाच्या किंवा तेथील नागरिकांच्या विकासावर लक्ष्य केंद्रित करण्याऐवजी केवळ युद्धखोरता आणि शस्त्रसज्जतेवर भर दिला. त्याची फळेही हा देश भोगताना दिसतो. लोकशाही व्यवस्था ऊजू न शकल्याने लष्करशाहीच्या वरवंट्याखाली सातत्याने येथील जनजीवन चिरडले गेल्याचे जगाने पाहिले आहे. दारिद्र्या, भ्रष्टाचार, अस्थिरता, दहशतवाद यांसारख्या कितीतरी प्रश्नांनी पाकिस्तान आज पोखरून निघाला आहे. येथील अर्थव्यवस्थाच नव्हे, तर राज्य, समाजव्यवस्थेसह सगळ्याच व्यवस्था कोलमडून पडल्या आहेत. मागच्या सात ते साडे सात दशकात भारत आणि पाकमध्ये अनेकदा संघर्ष झाला. पाकविरोधातील तीन मोठी युद्धे आपण जिंकली. अलीकडेच पहलगाम हल्ल्यानंतर दोन देशात झालेल्या युद्धसंघर्षातही पाकला मार खावा लागला. किंबहुना, इतके सारे होऊनही पाकची युद्धाची खुमखुमी कमी झालेली दिसत नाही, हाच मुनीर यांच्या म्हणण्याचा अर्थ घ्यावा लागेल. सध्या हे मुनीर महाशय चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेच्या काही नेते आणि अधिकाऱ्यांबरोबर पाकिस्तानशी निगडित मुद्द्यांवर चर्चा केली. विदेश दौऱ्यात अशा चर्चा, ऊहापोह होणे क्रमप्राप्तच. मात्र, विदेश दौऱ्यात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतानाच काश्मीर ही भारताची दुखरी नसल्याचे विधान करणे, हा खोडसाळपणाच म्हटले पाहिजे. बरे केवळ काश्मीरविषयी मुक्ताफळे उधळून ते थांबलेले नाहीत. पाकिस्तान हा एक अण्वस्त्रक्षम देश आहे. आम्ही बुडत आहोत, असे आम्हाला वाटले, तर आम्ही निम्म्या जगाला बरोबर घेऊ बुडू, असा इशारा देऊन त्यांनी थेट अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली आहे. हे गंभीर होय. मुख्य म्हणजे अमेरिकेत जाऊन मुनीर यांनी असे विधान करावे, हे संशयास्पद. मागच्या काही दिवसांत भारत आणि अमेरिकेतील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादून भारताबद्दलचा आपला आकस दाखवून दिला आहे. भारत आणि पाकमधील युद्धसंघर्षादरम्यानची ट्रम्प यांची भूमिकाही शंकाकुशंकांना वाव देणारी होते. आपणच या दोन देशातील युद्ध थांबवल्याचा दावा त्यांनी जवळपास पाच पन्नासवेळा केला. त्यामागे शांततेचे नोबेल पटकावण्याचा त्यांचा हेतू असल्याचे बोलले जाते. ते किती खरे, हे ट्रम्प यांनाच ठाऊक. परंतु, पाकिस्तानशी घसट करून भारताला शह देण्याची त्यांची नीती लपत नाही. पाकिस्तानला आतून आर्थिक मदत करायची व भारताशीही चांगले संबंध ठेवायचे, ही अमेरिकेची जुनी नीती राहिली आहे. परंतु, ट्रम्प काळात केवळ पाकिस्तानकेंद्री धोरणाकडे तर अमेरिका झुकत नाही ना, हे पहावे लागेल. मुनीर यांच्या दौऱ्यात त्यांचे अमेरिकेत जोरदार स्वागत झाले. पाकिस्तानमध्ये खुले किंवा छुपे बंड होण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल असू शकते, असे म्हटले जाते. पडद्यामागून कुटनिती करण्यात अमेरिका माहीर आहे. आता ट्रम्प यांच्या सत्ताकाळात तर कशालाच काही धरबंद उरलेला नाही. त्यामुळे अमेरिकेच्या मदतीने फिल्ड मार्शल मुनीर हे पाकचे अध्यक्ष बनू शकतात, असेही म्हटले जाते. हे बघता या सर्व परिस्थितीवर भारताला बारीक लक्ष ठेवावे लागेल. ट्रम्प हे संपूर्ण जगासाठी अवघड जागेवरचे दुखणे होऊन बसले आहे. अशा वेळी भारताला अतिशय सावधपूर्ण व मुत्सद्देगिरीने पावले टाकावी लागतील. मुनीर यांनी निम्म्या जगाला बुडवण्याची भाषा केली आहे. ही भाषा कशी आक्षेपार्ह आहे, हे आपण सर्व जगाला पटवून दिले पाहिजे. कुठल्याही राष्ट्रावर आपण स्वत:हून अण्वस्त्र हल्ला करणार नाही, ही भारताची जुनी नीती आहे. ती वेळोवेळी भारताने स्पष्टही केली आहे. मात्र, असे असताना ‘भारताने सिंधू नदीचे पाणी वळवण्यासाठी धरण बांधल्यास आम्ही ते क्षेपणास्त्राने उडवून देऊ,’ अशी युद्धखोरीची भाषा पाकचे लष्करप्रमुख करतात, हे जितके बेजबाबदार, तितकेच आक्षेपार्ह होय. म्हणूनच त्यावर युरोपिय राष्ट्रांसह जगभरातील सर्व देशांनी आक्षेप घेतला पाहिजे. अर्थात अमेरिकेसारख्या महासत्तेकडून याबाबत काही अपेक्षा करणे व्यर्थ होय. एकीकडे भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याबाबत ते आपल्यावर कारवाईचा बडगा उगारतात, तर त्यांच्याच देशात जाऊन अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकच्या लष्करशहाबद्दल साधा ब्रही काढत नाहीत. हा म्हणजे केवळ दुटप्पीपणा नसून, शुद्ध लबाडी आहे. मुळात आतून, बाहेरून खिळखिळ्या झालेल्या पाकिस्तानची स्वबळावर काही करण्याची औकात राहिलेली नाही. केवळ अमेरिका, चीनसारख्या देशांच्या पाठबळावर पाक बेटकुळ्या फुगवत आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. मागच्या काही वर्षांत संपूर्ण जगाचा पोत बदलताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये हुकूमशाही राजवटी आल्या आहेत. तर काही राज्यकर्त्यांकडून लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही लादली जात आहे. स्वाभाविकच लोकशाही व्यवस्थेपुढे अनेक आव्हाने उभी राहत आहेत. हे बघता पुढचा काळ हा संपूर्ण जगासाठी धोकादायक असेल. अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काळ सर्व जगाने अनुभवला आहे. भारतासारख्या देशाने या संघर्षाच्या काळात तटस्थ भूमिका घेणे पसंत केले. तथापि, यापुढच्या आव्हानात्मक काळात भारतीय परराष्ट्रनीतीचा अधिकच कस लागू शकतो.