हरियाणा हिंसाचारात पाकिस्तानी कनेक्शन
इस्लामाबाद-लाहोरमधून सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट
► वृत्तसंस्था/ नूह
हरियाणातील नूह हिंसाचारात आता पाकिस्तानी कनेक्शन समोर आले आहे. हरियाणा पोलिसांच्या तपासात पाकिस्तानी यूट्यूबर झिशान मुश्ताकची माहिती समोर आली आहे. त्याने प्रक्षोभक व्हिडिओ पोस्ट केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. युट्युबरने अहसान मेवाती पाकिस्तानी या नावाने सोशल मीडिया अकाउंट सुरू केले होते. वापरकर्त्याने आपले स्थान राजस्थानमधील अलवर असे दिले होते, परंतु प्रत्यक्षात तो पाकिस्तानमधील इस्लामाबाद आणि लाहोरमधून व्हिडिओ पोस्ट करत होता.
झिशानने पाकिस्तान एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्कद्वारे व्हिडिओ अपलोड केले. या केंद्रीकृत नेटवर्कद्वारे पाकिस्तानच्या शैक्षणिक संस्थांना इंटरनेट पुरवले जाते. हा पाकिस्तान सरकारचा एक भाग आहे. झिशानने मोनू मानेसरची हत्या आणि नूह येथील हिंसाचाराला भडकावली होती. ज्या दिवशी हिंसाचार सुरू होता, त्याच दिवशी जाळपोळ, तोडफोडीचे फुटेजही प्रसिद्ध होत होते. नूहमध्ये झिशानचे मजबूत नेटवर्क असल्याचा पोलिसांना संशय आहे. आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची तयारी सुरू केली आहे.
अलीकडे तयार करण्यात आलेल्या अनेक संशयास्पद सोशल मीडिया प्रोफाईलची पोलीस चौकशी करत आहेत. सातत्याने भडकाऊ पोस्ट आणि व्हिडिओ अपलोड केलेल्यांचा थांगपत्ता शोधण्याचा प्रयत्नही केला जात आहे. आतापर्यंतच्या तपासात झिशानचे प्रोफाईल संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दुसऱ्या दिवशीही बुलडोझरची कारवाई
दरम्यान, नूह येथील हिंसाचाराला पाच दिवस उलटूनही राज्य सरकारची बुलडोझरची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शनिवारी पोलीस दलासह अधिकारी 4 बुलडोझर घेऊन नूह येथे पोहोचले. येथे नल्हार रोडवर 30 घरे व दुकाने फोडण्यात आली. येथे बेकायदेशीर बांधकामे असून त्यात 31 जुलैला झालेल्या हिंसाचारातील रहिवाशांचा सहभाग होता. याआधी शुक्रवारी नूहमध्येच 25 घरे आणि दुकाने आणि 250 रोहिंग्यांच्या झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालवण्यात आला होता.