किश्तवाडमधील घुसखोरीत पाकिस्तानी कनेक्शन उघड
चकमकीनंतर जप्त केलेल्या वस्तूंवर पाकिस्तानचा पत्ता
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात 11 एप्रिल रोजी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर राबविलेल्या शोध मोहिमेत सुरक्षा दलांनी शनिवारी 1 एम4 रायफल, 2 एके47 रायफल, 11 मॅगझिन, 65 एम4 गोळ्या आणि 56 एके47 गोळ्या, तसेच टोप्या, औषधे, प्रथमोपचार साहित्य आणि मोजे जप्त केले.
यातील बऱ्याचशा वस्तू पाकिस्तानी बनावटीच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहशतवाद्यांकडे सापडलेल्या औषधांवर पाकिस्तान आणि लाहोरचा पत्ता लिहिलेला आहे. या चकमकीत मारले गेलेले तिन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सक्रीय सदस्य होते. त्यात टॉप कमांडर सैफुल्लाहचाही समावेश होता.
किश्तवाड प्रमाणेच जम्मू जिल्ह्यातील अखनूर येथे झालेल्या चकमकीत 9 पंजाब रेजिमेंटचे जेसीओ कुलदीप चंद हुतात्मा झाले होते. शुक्रवारी रात्री उशिरा येथे ही चकमक झडली होती. व्हाईट नाईट कॉर्प्सने हुतात्मा जेसीओ कुलदीप चंद यांना रविवारी लष्कराच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी केलेल्या मोहिमेचे नेतृत्व करताना त्यांना वीरमरण आले होते. कुलदीप चंद हे नवव्या पंजाब रेजिमेंटचे सैनिक होते. त्यांना ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) म्हणून नियुक्त करण्यात आले होते.