वातावरण तंग, एकूण 9 जण ताब्यात : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा कडक कारवाईचा आदेश
म्हापसा : हडफडे तसेच बागा येथे मंगळवारी रात्री दोन दुकानांच्या डिजिटल बोर्डवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा झळकल्या. हा धक्कादायक प्रकार असून स्थानिकांनी याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित दुकानमालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही ठिकाणांहून पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी कडक कारवाईचा आदेश दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बागा व हडफडे येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
बागा येथील सलूनचे दुकान तसेच हडफडे येथील वाईन शॉपच्या एलईडी डिजिटल बोर्डवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे आक्षेपार्ह लिहिल्याचे आढळून आले. हडफडेचे सरपंच रोशन रेडकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली आणि हणजूण पोलिसांना माहिती दिली. हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने हडफडेत ग्रामस्थ जमा झाले व त्या दुकानमालकाला जाब विचारला. वातावरण तंग होत असतानाच या घटनेची गंभीरता पाहून पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती चिघळण्यापूर्वी एलईडी बोर्डचे कनेक्शन तात्काळ कापले. तसेच दुकानमालकांविरोधात गुन्हे नोंद केले.
कळंगुट व हणजूण या दोन्ही पालिस ठाण्यांमध्ये बीएनएसच्या कलम 152 व 61 (2) व आयटी कायद्याच्या कलम 66सी व 66एफ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही दुकाने चालविणाऱ्यांना ताब्यात घेतले. एलईडीद्वारे पाकिस्तान झिंदाबाद लिहिण्यात आले असे असले तरी हा हॅक झाल्याचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. कुणीही एलईडी लावून नाहक बदनामीकारक वाक्ये घालून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. आता निवडणुकाही जवळ आल्या आहेत. शिवाय धार्मिक उत्सवही होणार आहे. मग ते कोणत्याही धर्माचे असो. यामुळे पुन्हा धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज खात्याने आणि खासकरून अशा एलईडीवर राज्यात कायमची बंदी घालावी अशी मागणी कळंगुटच्या पंच गीता लक्ष्मण परब यांनी दै. तरुण भारतशी बोलताना केली.
धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रकार- आमदार लोबो
हडफडे व बागा येथे घडलेला प्रकार म्हणजे लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेला आहे. देशात वा राज्यात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्याचे कुणाला धाडस होणार नाही. जो प्रकार घडला तो निंदनीय व सनातन धर्मात तेढ निर्माण करणारा आहे, अशी प्रतिक्रिया कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.