पाक युवा संघाचा भारतावर विजय
वृत्तसंस्था/ दुबई
येथे सुरु असलेल्या आशियाई क्रिकेट मंडळाच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या अ गटातील सामन्यात पाक युवा संघाने भारतीय युवा संघाचा 43 धावांनी पराभव केला. पाकच्या शाझेब खानला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या स्पर्धेतील हा तिसरा सामना आहे. शनिवारीच्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 281 धावा जमविल्या. त्यानंतर भारताचा डाव 47.1 षटकात 238 धावांत आटोपला.
पाकच्या डावामध्ये शाझेब खानने 147 चेंडूत 10 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 159 धावांची खेळी केली. उस्मान खानने 94 चेंडूत 6 चौकारांसह 60 धावा जमविल्या. पाकच्या या सलामीच्या जोडीने 160 धावांची भागिदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर पाकचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. मोहम्मद रियाजुल्लाने 33 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 27 धावा जमविल्या. पाकच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारतातर्फे समर्थ नागराजने 45 धावांत 3 तर आयुष म्हात्रेने 30 धावांत 2 गडी बाद केले. किरण चोरमाले आणि गुहा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये निखिल कुमारने एकाकी लढत देत 77 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 67 धावा जमविल्या. 10 व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मोहम्मद इनानने 22 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 30 धावा जमविल्या. पांगलियाने 4 चौकारांसह 26, चोरमालेने 2 चौकारांसह 20, कर्णधार मोहम्मद अमानने 1 चौकारासह 16, सिद्धार्थने 3 चौकारांसह 15 आणि सलामीच्या म्हात्रेने 5 चौकारांसह 20 धावा जमविल्या. पाकतर्फे अलि रझाने 36 धावांत 3 तर अब्दुल सुभान आणि फहेम उल हक्क यांनी प्रत्येकी 2 तसेच नावेद अहमद खान आणि उस्मान खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - पाक 50 षटकात 7 बाद 281 (शाझेब खान 159, उस्मान खान 60, मोहम्मद रियाजुल्ला 27, अवांतर 17, नागराज 3-45, म्हात्रे 2-30), भारत 47.1 षटकात सर्व बाद 238 (निखिल कुमार 67, मोहम्मद इनान 30, पांगलिया 26, म्हात्रे 20, चोरमाले 20, अवांतर 20, अलि रझा 3-36, अब्दुल सुभान आणि फहेम उल हक्क प्रत्येकी 2 बळी, नावेद अहमद खान आणि उस्मान खान प्रत्येकी 1 बळी).