For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनडे मालिकेत पाक महिलांची विजयी सलामी

06:26 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
वनडे मालिकेत पाक महिलांची विजयी सलामी
Advertisement

पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा 168 धावांनी पराभव, सदाफ शमस सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था, कराची

सामनावीर सदाफ शमासच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान पाक क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा 168 धावांनी दणदणीत पराभव करत तीन सामन्यांच्या महिलांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. सदाफ शमसने 130 चेंडूत 98 धावा झोडपल्या.

Advertisement

या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाक महिला संघाने 50 षटकांत 5 बाद 330 धावा जमविल्या. त्यानंतर झिम्बाब्वेचा डाव 36.4 षटकांत 162 धावांत आटोपला.

पाकच्या डावामध्ये 4 फलंदाजांनी अर्धशतके झळकविली. सलामीच्या सदाफ शमसने गुल फिरोजासमवेत सलामीच्या गड्यासाठी 28.2 षटकांत 162 धावांची दीडशतकी भागिदारी केली. फिरोजाने 60 चेंडूत 5 चौकारांसह 50 धावा जमविल्या. शमसने 17 चौकारांसह 130 चेंडूत 98 धावांचे योगदान दिले. सिद्रा अमिनने 59 चेंडूत 9 चौकारांसह 67 धावा केल्या. आयशा जाफर आणि अलिया रियाज या दोघी अनुक्रमे 3 आणि 2 धावांवर बाद झाल्या. नाजीया अल्वीने 30 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 56 तर कर्णधार फातिमा सनाने 3 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 11 धावा जमविल्या. पाकच्या डावात 2 षटकार आणि 40 चौकार नोंदविले गेले. झिम्बाब्वेतर्फे प्रेशियस मारांगेने 39 धावांत 3 तर चिगोरा आणि नॉमवेलो सिबांदा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या अचूक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. बिलोव्हड बिझा या एकमेव फलंदाजाने अर्धशतक झळकविले. तिने 53 चेंडूत 8 चौकारांसह 53 धावा जमविल्या. केलिस निधलोवूने 47 चेंडूत 5 चौकारांसह 31 तर केली एन्दिरायाने 2 चौकारांसह 11, कर्णधार सिबांदाने 3 चौकारांसह 17 तसेच कांचांग्वेने 1 चौकारांसह 10 धावा केल्या. झिम्बाब्वेच्या डावात 23 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे फातिमा सना, तस्मिया रुबाब, सईदा शहा यांनी प्रत्येकी 2 तर मोमीना रियासत आणि नशरा संधू यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : पाक 50 षटकांत 5 बाद 330 (सदाफ शमस 98, गुल फिरोजा 50, सिद्रा अमिन 67, नाजीहा अल्वी नाबाद 56, फातिमा सना नाबाद 11, अवांतर 43, प्रेशियस मारांगे 3-39, चिगोरा, सिबांदा प्रत्येकी 1 बळी), झिम्बाब्वे 36.4 षटकांत सर्वबाद 162 (बिझा 53, निधलोवू 31, एन्डिराया 11, कांचींग्वे 10, सिबांदा 17, अवांतर 12, फातिमा सना, तस्मिया रुबाब, सईदा शहा प्रत्येकी 2 बळी, मोमिना रियासत आणि नशरा संधू प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.