पाकचा न्यूझीलंडवर सात गड्यांनी विजय
फक्र झमानचे वनडेतील सलग तिसरे शतक, मालिकेत पाक आघाडीवर
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील शनिवारी येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात फक्र झमानच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर यजमान पाकने न्यूझीलंडचा 10 चेंडू बाकी ठेवून सात गड्यांनी पराभव केला. नाबाद 180 धावा झळकवणाऱ्या फक्र झमानला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या मालिकेत पाकने न्यूझीलंडवर 2-0 अशी आघाडी मिळवली आहे.
या दुसऱ्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 50 षटकात 5 बाद 336 धावा जमवल्या. त्यानंतर पाकने 48.2 षटकात 3 बाद 337 धावा जमवत या मालिकेत आपला सलग दुसरा विजय नोंदवला. पाकच्या फक्र झमानने वनडे क्रिकेटमध्ये सलग तीन शतके झळकवली आहेत. असा पराक्रम करणारा फक्र झमान हा पाकचा चौथा फलंदाज आहे. तसेच त्याने वनडे क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा गाठला आहे. वनडे क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारा पाकचा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. वनडे क्रिकेटमधील पाकची 3 बाद 337 ही चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या डॅरील मिचेलचे शतक (129) तसेच बोवेस आणि लेथम यांची अर्धशतके वाया गेली.
न्यूझीलंडच्या डावामध्ये मिचेलने 119 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारासह 129, बोवेसने 51 चेंडूत 7 चौकारासह 51, यंगने 4 चौकारासह 19, कर्णधार लॅथमने 85 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह 98, निशमने 1 चौकारासह नाबाद 17 धावा जमवल्या. बोवेस आणि मिचेल यांनीदुसऱ्या गड्यासाठी 86 धावांची भागीदारी केली. बोवेस बाद झाल्यानंतर मिचेल आणि लॅथम यांनी तिसऱ्या गड्यासाठी 183 धावांची भर घातली. न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 28 चौकार नोंदवले गेले. पाकतर्फे हॅरीस रौफ यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 78 धावात 4 तर नसिम शहाने 49 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना फक्र झमान आणि इमाम उल हक या सलामीच्या जोडीने 66 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडच्या हेन्रीने इमाम उल हकला झेलबाद केले. त्याने 26 चेंडूत 3 चौकारासह 24 धावा जमवल्या. कर्णधार बाबर आझमने फक्र झमानसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 135 धावांची भागीदारी केली. बाबर आझमने 66 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 65 धावा जमवल्या. अब्दुल्ला शफीक 7 धावावर बाद झाला. फक्र झमाने मोहमद रिझवानला साथीला घेत आपल्या संघाला थरारक विजय मिळवून दिला. या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 119 धावांची भागीदारी केली. फक्र झमानने 144 चेंडूत 6 षटकार आणि 17 चौकारासह नाबाद 180 तर रिझवानने 41 चेंडूत 6 चौकारासह नाबाद 54 धावा झळकवल्या. पाकच्या डावात 7 षटकार आणि 31 चौकार नोंदवले गेले. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री, सिप्ले आणि सोधी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 50 षटकात 5 बाद 336 (यंग 19, बोवेस 51, मिचेल 129, लॅथम 98, निशम नाबाद 17, चॅपमन 1, निकोल्स नाबाद 6, अवांतर 15, हॅरीस रौफ 4-78, नसिम शहा 1-49), पाक 48.2 षटकात 3 बाद 337 (फक्र झमान नाबाद 180, इमाम उल हक 24, बाबर आझम 65, शफीक 7, मोहमद रिझवान नाबाद 54, अवांतर 7, हेन्री 1-59 सिप्ले 1-58, सोधी 1-79).