पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागणार : तालिबान
अफगाणी कधीच काही विसरत नाहीत
वृत्तसंस्था/ काबूल
पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या पाकटीका प्रांतात भीषण हवाई हल्ले केले होते. हे हल्ले दहशतवादी तळांवर केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता, परंतु अफगाणिस्तान यावरून भडकला आहे. तालिबानचे विदेशमंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी पाकिस्तानला परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना आम्ही कधीच विसरणार नाही. याचा सूड उगविला जाणार आहे. पाकिस्तानसारख्या देशांनी रशिया, ब्रिटन आणि नाटोकडून धडा घेण्याची गरज आहे. या सर्व देशांना अफगाणिस्तानने धडा शिकविला होता, असे मुत्ताकी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने अत्यंत विचारपूर्वक अफगाणिस्तानविषयी पाऊल उचलावे. मुलांना मारणे, महिला अन् वृद्धांची कत्तल करणे शूरपणा नाही. लोकांची घरं नष्ट करणे म्हणजे साहस नाही. वजीरिस्तानचे लोकही आज पाकिस्तानमुळे बेघर झाले आहेत असे मुत्ताकी यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानच्या भूमीवरून आम्ही कुठल्याही उग्रवादी समुहाला हल्ले करू दिलेले नाहीत. अफगाणिस्तानवर खोटे आरोप केले जात असून यामुळे संबंधितांचे नुकसानच होणार असल्याचे वक्तव्य तालिबानचे उपपंतप्रधान मावलावी अब्दुल कबीर यांनी केले आहे.
तर संयुक्त राष्ट्रसंघानुसार पाकिस्तानच्या हल्ल्यात अनेक महिला, वृद्ध आणि मुले मारली गेली आहेत. या हवाई हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या या आगळीकीवर तालिबान कोणते प्रत्युत्तर देणार हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु तालिबानच्या नेत्यांनी सूड उगविला जाणार असल्याचे म्हटल्याने पाकिस्तानच्या सैन्याची धास्ती वाढली आहे.