पाकिस्तानची होईल आर्थिक कोंडी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तावर ‘सिंदूर अभियाना’च्या अंतर्गत केलेली कार्यवाही हा या अभियानाचा प्रथम भाग आहे. खासदारांची शिष्टमंडळे पाठवून जगभर पाकिस्तानला उघडे पाडणे, हा या अभियानाचा द्वितीय भाग आहे. तर व्यापारबंदी, व्हिसाबंदी आणि पाणीबंदी करुन पाकिस्तानची आर्थिक कोंडी करणे, हा ‘सिंदूर’ अभियानाचा तिसरा भाग आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ओडीशातील खासदार बिजयंत पांडा यांनी केले आहे.
बिजयंत पांडा यांच्या नेतृत्वात भारतीय लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सदस्यांचे एक शिष्टमंडळ भारताच्या ‘ग्लोबल आऊटरीच’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन आणि अल्जिरीया या देशांचे नेते आणि अधिकारी यांच्याशी चर्चा करुन शनिवारी भारतात परतले आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय इस्लामी संघटनेच्या काही वरीष्ठ नेत्यांशीही चर्चा केली. भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका या देशांना समजून दिली. आम्ही पाकिस्तानवर जे आर्थिक निर्बंध घातले आहेत, ते पाकिस्तानला योग्य मार्गावर आणण्यासाठी आहेत. आम्हाला कोणाशीही विनाकारण संघर्ष करायची इच्छा नाही. आम्ही कधीही तसे केलेले नाही. तथापि, पाकिस्तानने आपला दहशतवादाचा मार्ग सोडला नाही, तर त्या देशाला वारंवार धडे देण्याची आणि त्याच्याच औषधाची चव त्यालाच दाखविण्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत, हे आम्ही ‘सिंदूर’ अभियानाच्या माध्यमातून सिद्ध केले आहे, असे आम्ही या चार देशांच्या नेत्यांसमोर स्पष्ट केले, अशी माहिती पांडा यांनी दिली. पांडा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत.