For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानला धूळ चारली

06:44 AM Feb 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानला धूळ चारली
Advertisement

रविवार हा भारतीय क्रिकेट रसिकांसाठी खास ठरला. लंकेच्या भूमीत भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला चारीमुंड्या चित करत रविवारची शाम सुहानी करुन टाकली. क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान सामना हा नेहमीच थरारक, भावनिक असतो. रविवारी दूरदर्शनवरील बातम्या प्रसारीत करणाऱ्या वाहिन्यांनी दिवसभर या सामन्याबाबत ताज्या घडामोडी, प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया, माजी खेळाडुंच्या प्रतिक्रीया मिळवत उत्सुकता वाढवली होती. पण रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या टी20 विश्वचषकाच्या साखळी फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत करून फक्त एक विजय मिळवला नाही, तर आपली सर्वांगीण श्रेष्ठता, तयारी आणि मानसिक दृढता जगभरात दाखवून दिली. प्रथम फलंदाजी करताना 175/7 पर्यंत मजल मारलेल्या भारताने पाकिस्तानला 114 धावांवर गारद केले. हा सामना केवळ आकडेवारीचा नाही, तर फलंदाजीतील आक्रमकता, गोलंदाजीतील नियंत्रण आणि रणनीतीतील चातुर्य यांचा अप्रतिम नमुना होता. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पिच मंद आणि फिरकीला मदत करणारी होती. त्यामुळे त्यांनी सहा फिरकी गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. ही त्यांची रणनीती तशी धाडसी वाटली, पण ईशान किशनने ती पूर्णपणे उधळून लावली. अभिषेक शर्मा पहिल्या षटकात सलमान आगाकडून शून्यावर बाद झाला, तरी ईशानने न डगमगता आत्मविश्वासासोबत खेळ सुरू केला. 27 चेंडूत अर्धशतक करतानाच शेवटी 10 चौकार आणि 3 षटकारांच्या माध्यमातून 40 चेंडूत 77 धावा पूर्ण केल्या. भारताला मुख्य धावसंख्येत मजबूत आधार देण्याचे काम केले. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याची पायांची चाल, चेंडूला भिडण्याची तयारी, डान्स-डाऊन-द-ट्रॅक फटके आणि वेळीच स्वीप-रिवर्स स्वीप यांनी आधुनिक फलंदाज कसा फिरकीला सामोरा जातो ते दाखवून दिले. पूर्वी साधारण सुनील गावसकर यांच्या काळात फिरकीविरुद्ध फूटवर्क आणि डोळ्यांचा संपर्क यावर खूप भर दिला जायचा. ईशानने ते परिपूर्ण दाखवले. त्याने चेंडूचा अंदाज घेतला, पिचचा केवळ फायदा घेतला नाही तर त्यावर वर्चस्व गाजवले. सूर्यकुमार यादव (32), तिलक वर्मा (25) आणि शिवम दुबे (27) यांनीही योग्य वेळी अपेक्षीत अशी भागीदारी केली. या साऱ्यांच्या एकत्रित चांगल्या योगदानामुळे 176 धावांचे नाही म्हटले तरी तगडे आव्हान पाकपुढे ठेवले गेले. पाकिस्तानच्या साईम अयुबने 3 विकेट घेतल्या, पण भारताने 176 धावांचे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोसळली. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी पहिल्या दोन ओव्हरमध्ये आघाडीचे तीन फलंदाज तंबूत पाठवले. बुमराहची स्विंग, अचूक लाईन-लेंथ आणि पांड्याची विविधता याने पाकिस्तानची सुरुवातच खराब झाली. नंतर अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि तिलक वर्मा यांच्या फिरकीने पाकिस्तानला बांधून ठेवले. प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. उस्मान खानने 44 धावा करून एकटाच लढा दिला, पण इतर साथीदार खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. पहिल्या चार फलंदाजांना 10 धावाही करता आल्या नाहीत. भारताच्या गोलंदाजीतील अनुशासन आणि नियंत्रण यामुळे पाकिस्तानला कधीच सामना हातात घेता आला नाही. पाकिस्तानकडून उस्मान तारिकच्या गोलंदाजीबद्दल आधी बरीच चर्चा झाली होती. त्याच्या डिलिव्हरीतील थोडा पॉझ आणि वेगळी शैली यामुळे चकिंगचे आरोपही झाले, पण नियमांनुसार ते वैध आहे. भारताने सरावात त्याचा विशेष अभ्यास केला. सूर्यकुमारने सुरुवातीला त्याला चांगला सामना केला, पण एकोणिसाव्या षटकात बाद झाला. तारिकने 4 षटकात 24 धावा देत 1 विकेट घेतली. यातून भारताच्या तयारीचे महत्त्व दिसते. हा विजय भारताला सुपर 8 फेरीत स्थान मिळवून देणारा ठरला. गुणतालिकेत पहिले स्थान. टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताची आकडेवारी आता 8-1 झाली आणि हे सर्वात मोठे विजय अंतर आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली संघात एकजूट आणि विश्वास दिसला. युवा ईशान किशनने सामनावीराचा किताब पटकावला, पण संपूर्ण संघाने सामना जिंकला. या सामन्यातून अनेक धडे मिळाले. पहिला पिच कशीही असो, फलंदाजाने आत्मविश्वास ठेवून आक्रमक राहिले पाहिजे. दुसरा गोलंदाजीतील विविधता आणि नियंत्रणच सामना जिंकून देतो. तिसरा पाकिस्तानसारख्या बलाढ्या संघाविरुद्धही तयारी आणि रणनीतीने वर्चस्व गाजवता येते. पाकिस्तानची फिरकीवर अवलंबून राहण्याची रणनीती चांगली होती, पण फलंदाजीतील कमकुवतपणा आणि भारताच्या गोलंदाजांच्या गुणवत्तेपुढे टिकली नाही. भारतीय क्रिकेटसाठी हा विजय मोठा संदेश आहे. भारतीय संघ हा नेहमीपणे फलंदाज-गोलंदाज यांनी परिपूर्ण आहे, हे नाकारता येणार नाही. अलीकडच्या काही ताज्या विजेतेपदानंतर तर भारतीय संघाची धास्ती न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांनीसुद्धा घेतलेली दिसून आली आहे. सुपर 8 मध्ये आता कठीण सामने असतील, पण या संघात बुमराह, पांड्या, अक्षर, वरुण, ईशान, सूर्यकुमार अशी सर्व विभागात ताकद आहे. 2026 च्या विश्वचषकात भारताने पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. पाकिस्तानचा संघ तर मागच्या चुकांमधून काही शिकलेला दिसला नाही. याखेपेलाही भारतीय गोलंदाजांपुढे त्यांनी नांगी टाकलीच. पाकिस्तानला आता पुनर्विचार करावा लागेल. फलंदाजी, मानसिकता आणि रणनीती यात बदल आवश्यक आहे. एकूणच, कोलंबोतील हा सामना भारतीय क्रिकेटच्या प्रगतीचा, युवा प्रतिभेचा आणि संघभावनेचा उत्कृष्ट दाखला ठरला. क्रिकेटप्रेमींना अशाच थरारक आणि एकतर्फी विजयांची अपेक्षा आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.