भिक्षापात्र घेऊन जगभरात फिरतो पाकिस्तान
देशाच्या बिकट स्थितीची शाहबाज शरीफांनी दिली कबुली
वृत्तसंस्था/ क्वेटा
जग आता पाकिस्तानने भिक्षापात्र घेऊन आपल्याकडे येऊ नये अशी अपेक्षा बाळगून आहे. देशाने आता मदतीऐवजी व्यापार, गुंतवणूक आणि विकासावर लक्ष देण्याची गरज आहे. पाकिस्तानने आता भीक मागत राहण्यासाठी आर्थिक आत्मनिर्भरतेच्या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे. तसेच देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा पूर्ण वापर करण्याची गरज असल्याचे उद्गार पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी क्वेटा येथे सैनिकांना संबोधित करताना काढले आहेत. भिक्षापात्र हातात घेत अन्य देशांकडून मदत मागतो अशी कबुली अखेर पाकिस्तानने दिली आहे.
आम्ही व्यापार, शिक्षण, नवोन्मेष, आरोग्य आणि नफा देणाऱ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीद्वारे जोडले जावे अशी जग आमच्याकडून अपेक्षा बाळगत आहे. पाकिस्तानने भीक मागू नये असे जगाला वाटत आहे. मी आणि फील्ड मार्शल आसीम मुनीर आता हा भार आणखी उचलणार नाही. आता हा भार पूर्ण देशाच्या खांद्यांवर आहे. पाकिस्तानने स्वत:च्या साधनसामग्रीचा चांगला वापर करत विकास करावा असे शाहबाज यांनी म्हटले आहे.
मित्रांचा केला उल्लेख
शरीफ यांनी काही देशांसोबत पाकिस्तानची घनिष्ठ मैत्री असल्याचे म्हटले आहे. चीन हा पाकिस्तानचा सर्वाधिक कसोटीवर उतरलेला मित्र आहे. तर सौदी अरेबिया सर्वात विश्वसनीय सहकारी असल्याचे म्हणत शाहबाज यांनी तुर्किये, कतार आणि संयुक्त अरब अमिरातचा उल्लेख केला आहे.
जगाकडून सातत्याने घेतोय कर्ज
काही दिवसांपूर्वी आयएमएफने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे नवे (जवळपास 8500 कोटी रुपये) कर्ज दिले आहे. तर चीनने पाकिस्तानला जूनच्या अखेरपर्यंत चिनी चलनात 3.7 अब्ज डॉलर्सचे (32 हजार कोटी रुपये) वाणिज्यि कर्ज पुन्हा देण्याचे आश्वासन दिले आहे. मागील काही काळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था खूपच खालावली आहे. चालू आर्थिक वर्षात डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयात मोठी घसरण झाली आहे. पाकिस्तान मागील काही काळापासून केवळ विदेशातून कर्ज अन् जुन्या कर्जाच्या पुनर्रचनेवर स्वत:चा आर्थिक गाडा हाकत असल्याचे दिसून आले आहे.
सिंधू जल करार स्थगित झाल्याने बिथरला
पाकिस्तानी खासदार सैयद अली जफर यांनी काही दिवसांपूर्वी सिंधू जल करारावरून पाकिस्तानची अस्वस्थता दाखवून दिली होती. करारावरील संकटावर तोडगा न काढल्यास मोठी लोकसंख्या उपासमारीमुळे मृत्युमुखी पडू शकते. सिंधु खोरे आमची जीवनरेषा आहे. आमचे तीन-चतुर्थांश पाणी देशाबाहेरुन येते. दर 10 लोकांपैकी 9 लोक आंतरराष्ट्रीय सीमेतून येणाऱ्या पाण्यावर उदरनिर्वाह करत असल्याचे जफर यांनी म्हटले होते.