भारताचा श्वास रोखण्याची पाकिस्तानकडून धमकी
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
तुम्ही आमचा पाणीपुरवठा बंद करा, आम्ही तुमचा पाणीपुरवठा बंद करू. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला. भारताने या करारांतर्गत येणाऱ्या नद्यांच्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची कसरत सुरू केली आहे. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तानमध्ये अडचणी सुरू झाल्यानंतर राज्यकर्ते आणि लष्करी अधिकाऱ्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. आता लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी ‘भारताचा श्वास रोखण्याची’ धमकी दिली आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रचार शाखेतील इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक अहमद शरीफ चौधरी यांनी पाकिस्तानातील एका विद्यापीठात कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सिंधू पाणी कराराच्या स्थगितीचा उल्लेख करत ‘जर तुम्ही (भारताने) आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू.’ असा इशारा दिला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 23 एप्रिल रोजी सिंधू पाणी करार स्थगित केला. तेव्हापासून भारताने वारंवार ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’ असे स्पष्ट केले आहे. जोपर्यंत पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित राहील, असा पवित्रा भारताने घेतला आहे. 19 सप्टेंबर 1960 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी करार झाला होता. हा करार रावी, बियास, सतलज, सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाणीवाटपाशी संबंधित आहे.