रेल्वेच्या अपहरणामुळे हादरला पाकिस्तान
शेकडो प्रवासी ओलीस धरल्याचा फुटीरवाद्यांचा दावा : किमान 20 सैनिक पडले मृत्युमुखी
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानच्या वायव्य भागात एका प्रवासी रेल्वेचेच अपहरण करण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. हे अपहरण बलोच लिबरेशन आर्मी या संघटनेने केल्याचे स्पष्ट झाले आहे. अपहृत रेल्वेत 400 हून अधिक प्रवासी असून त्यांना ओलीस धरल्याचे या संघटनेकडून स्पष्ट करण्यात आल्याने पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांताला पाकिस्तानपासून मुक्त करुन स्वतंत्र राष्ट बनविण्याचा प्रयत्न ही संघटना करीत आहे. रेल्वे आणि प्रवाशांची मुक्तता करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अपहृत प्रवासी रेल्वेचे नाव ‘जाफर एक्स्पे्रस’ असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रेल्वेचे अपहरण होत असताना बलुची बंडखोर आणि पाकिस्तानी सैनिक यांच्यात झालेल्या चकमकीत किमान 20 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. पाकिस्तानने बंडखोरांविरोधात कारवाई केल्यास सर्व ओलीस प्रवाशांना ठार करण्यात येईल, अशी धमकी बलोच लिबरेशन आर्मीच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान प्रशासन चिंतातूर झाले असून सुटका करण्यासाठी रणनीती तयार करण्यात येत आहे.
हवाई हल्ला करणार
बंडखोरांनी ओलीसांची मुक्तता केली नाही, तर त्यांच्यावर वायुहल्ला केला जाईल, असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. मात्र, हा हल्ला केव्हा केला जाईल याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पाकिस्तानने कोणत्याही प्रकारे हल्ला केला तरी प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहोत, असे बंडखोरांचे म्हणणे आहे.
क्वेट्टा ते पेशावर प्रवासात अपहरण
ही जाफर एक्स्पे्रस वायव्य पाकिस्तानातील क्वेट्टा येथून पेशावर येथे निघाली होती. मंगळवारी सकाळी बलुची बंडखोरांनी रेल्वेमार्गांवर स्फोट घडवून ते उद्ध्वस्त केले. त्यामुळे जाफर एक्स्पे्रसला थांबावे लागले. रेल्वे थांबल्यानंतर आजूबाजूला लपलेल्या बंडखोरांनी तिचा ताबा घेतला. रेल्वेत 400 हून अधिक प्रवासी होते. त्यांच्यापैकी 200 हून अधिक प्रवाशांनी पळून जाऊन आली सुटका करुन घेतली. मात्र, बंडखोरांच्या ताब्यात सध्या 188 प्रवासी असल्याची माहिती आहे.
बंडखोरांची धमकी
अपहृत रेल्वे सोडविण्यासाठी पाकिस्तानच्या सेनेने कारवाई केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही पूर्ण तयारीत आहोत. पाकिस्तानी सैनिकांचा प्रतिकार केला जाईल. पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केल्यास सर्व ओलीस प्रवाशांना ठार मारण्यात येईल, अशी धमकी बलोच लिबरेशन आर्मीने दिली आहे.
बलुचिस्तान महत्त्वाचा प्रांत
पाकिस्तानच्या एकंदर क्षेत्रफळाच्या 44 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात असणारा बलुचिस्तान प्रांत हा सैनिकी आणि धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रांत पाकिस्तानातील सर्वात मोठा, पण लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात कमी संख्येचा प्रांत आहे. त्याची एक सीमा इराणला लागून असून ग्वादर हे महत्त्वाचे बंदर याच प्रांतात आहे. या प्रांताच्या सीमा पाकिस्तानातील पंजाब, खैबर पख्तुनख्वा आणि सिंध या प्रांताच्या सीमांना लागून आहेत. अफगाणिस्तानलाही हा प्रांत लागून आहे.
11 सैनिक ठार
बलोच बंडखोरांनी रेल्वे पळविल्याचे वृत्त येताच पाकिस्तानी सेनेने रेल्वे सोडविण्याच्या दृष्टीने हालचालींना प्रारंभ केला. यावेळी बंडखोर आणि पाकिस्तानी सैनिक यांच्यात मोठी चकमक उडाली. या चकमकीत आतापर्यंत 11 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. हाही पाकिस्तानला मोठा धक्का आहेत. बंडखोरांची संख्या नेमकी किती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, ते शस्त्रसज्ज असून पूर्ण तयारीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.
वाद काय आहे...
बलुचिस्तान विरुद्ध पाकिस्तान हा वाद अनेक दशकांपासूनचा आहे. पाकिस्तान आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर बलुचिस्तानला पाकिस्तानात जायचे नव्हते. तथापि, सक्तीने त्याचा समावेश पाकिस्तानात करण्यात आला. तथापि, येथील जनता कधीही मनापासून पाकिस्तानात समाविष्ट झाली नाही. सातत्याने या जनतेने पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. याच कारणासाठी बलोच लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेने पाकिस्तान सरकारला उघड आव्हान दिले आहे. या रेल्वे अपहरणाच्या घटनेमुळे पुन्हा ही संघटना आणि पाकिस्तानची सेना यांच्यात उघड संघर्ष होणे शक्य आहे.
सनसनाटी अपहरण...
ड रेल्वेमार्ग उद्ध्वस्त करुन बलोच लिबरेशन आर्मीने थांबविली प्रवासी रेल्वे
ड रेल्वे थांबताक्षणीच बंडखोरांचा तिच्यावर ताबा, 185 प्रवासी धरले ओलीस
ड बंडखोर आणि पाकिस्तानी सैनिक यांच्यात चकमक, अनेक सैनिक ठार
ड कारवाई केल्यास सर्व प्रवाशांना ठार करण्याची पाकिस्तान सरकारला धमकी