For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एससीओ परिषदेसाठी पाकिस्तान सज्ज

06:55 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
एससीओ परिषदेसाठी पाकिस्तान सज्ज
Advertisement

इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात : एस जयशंकर यांच्यासह भारतीय शिष्टमंडळ दाखल

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) एससीओ सदस्य देशांच्या सरकार प्रमुखांची 23 वी बैठक इस्लामाबादमध्ये 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होत आहे. या कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राष्ट्रीय राजधानी इस्लामाबादमध्ये लष्कराच्या तैनातीसह कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या परिषदेदरम्यान इस्लामाबादसोबतच शेजारील रावळपिंडी आणि इतर काही शहरांमध्ये सर्व प्रकारच्या निदर्शने आणि रॅलींवर बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement

एससीओ शिखर परिषदेसाठी पाकिस्तानात विदेशी शिष्टमंडळे दाखल होण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला. 6 सदस्यीय रशियन शिष्टमंडळ आणि एससीओचे सात प्रतिनिधी पाकिस्तानला पोहोचले आहेत. याशिवाय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या नेतृत्त्वातील भारताचे चार सदस्यीय अधिकृत शिष्टमंडळही पाकिस्तानात पोहोचले आहे. त्याव्यतिरिक्त चीनचे 15, किर्गिस्तानचे चार आणि इराणचे दोन सदस्यीय शिष्टमंडळही इस्लामाबादला पोहोचले आहे.

2001 मध्ये स्थापन झालेल्या ‘एससीओ’चे उद्दिष्ट प्रदेशात राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्याला चालना देण्याचे आहे. ‘एससीओ’मध्ये पाकिस्तान, चीन, भारत, रशिया, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि बेलारूस यांचा समावेश आहे. तसेच इतर 16 देश निरीक्षक किंवा ‘संवाद भागीदार’ म्हणून कार्यरत आहेत.

पाकिस्तानात एससीओ परिषदेसाठी पाकिस्तानने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. फेडरल पॅपिटलमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या शिखर परिषदेच्या अगोदर एक सर्वसमावेशक सुरक्षा योजना तयार करण्यात आल्याचे इस्लामाबादचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) नासिर अली रिझवी यांनी एका निवेदनात सांगितले. विदेशी पाहुण्यांचे वास्तव्य असलेल्या हॉटेल्सच्या ठिकाणी विशेष सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील. पोलीस दलाचे 9,000 हून अधिक कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.