पाक पंतप्रधानांची पाकिस्तानातच खिल्ली
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रंप यांचे अभिनंदन पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी केले आहे. मात्र, यामुळे त्यांची पाकिस्तानातच खिल्ली उडविली जात आहे. कारण त्यांनी हे अभिनंदन ‘एक्स’ या समाजमाध्यमाचा उपयोग करुन केले, ज्यावर त्यांनीच पाकिस्तानात बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांची अभिनंदनाची पोस्ट त्या देशात चेष्टेचा विषय झाली आहे.
पाकिस्तानचे सूचना प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी या वर्षाच्या प्रारंभी एक्सवर बंदी घोषित केली होती. पण आज त्याच माध्यमाचा आधार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ट्रंप यांचे अभिनंदन करण्यासाठी घ्यावा लागला आहे. एक्सवरची बंदी उठविली नसतानाही त्या देशाच्या पंतप्रधानांनी या माध्यमाचा उपयोग केला, यावर पाकिस्तानातच जोरदार टीका होत असून शहबाझ शरीफ हे किती दांभिक आहेत, हे त्यांच्या कृतीवरुन दिसून येते, असे मत इंटरनेटवर अनेक पाकिस्तानी नागरीकांनी व्यक्त केले आहे. तसेच बंदी असताना ते या माध्यमाचा उपयोग करु कसे शकले, असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे. ‘आमचे अमेरिकेशी अनेक दशकांपासूनचे संबंध असून ट्रंप यांच्या नेतृत्व काळात ते आणखी दृढ होतील, अशी अपेक्षा या अभिनंदन संदेशात व्यक्त केली गेली आहे.