पाकिस्तान राष्ट्रपतींची प्रकृती बिघडली
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
ईदचा सण आनंदाने साजरा केल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची प्रकृती अचानक बिघडली. बुधवारी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाकिस्तानी माध्यमांनुसार, ताप आणि संसर्गाची तक्रार केल्यानंतर 69 वर्षीय झरदारी यांना कराचीपासून सुमारे 300 किमी अंतरावर असलेल्या नवाबशाह रुग्णालयात आणण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयाभोवती कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच, राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयात कायदा अंमलबजावणी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, रुग्णालयाच्या आवारात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला प्रवेश करण्यासही मनाई आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी फोन करून राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यासोबतच त्यांनी झरदारी यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना अनेक वेळा आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.