For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाक स्पर्धेतून बाहेर, न्यूझीलंड उपांत्य फेरीत

06:58 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाक स्पर्धेतून बाहेर  न्यूझीलंड उपांत्य फेरीत
Advertisement

लंकेचा पाच धावांनी पराभव, शतकवीर फरहान सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था, कॅन्डी

आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे सुपर-8 मधील सामन्यात सामनावीर फरहानच्या दमदार शतकाच्या जोरावर पाकिस्तानने लंकेचा केवळ पाच धावांनी पराभव केला. पण हा सामना जिंकूनही पाकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आता या स्पर्धेत द. आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड या तीन संघांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. दरम्यान रविवारी होणाऱ्या विंडीज आणि भारत यांच्या सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीतला चौथा संघ ठरेल.

Advertisement

पाक आणि लंका यांच्यातील शनिवारचा हा सामना 30 वा होता. लंकेने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. साहीबजादा फरहान आणि फक्र झमान या सलामीच्या जोडीने तुफान फटकेबाजी करत 15.5 षटकांत 176 धावांची दीडशतकी भागिदारी केली. पण त्यानंतर धावांचा वेग वाढविण्याच्या नादात पाकने आपले 8 गडी 34 धावांत गमविले. पाकने 20 षटकांत 8 बाद 212 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 20 षटकांत 6 बाद 207 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना थोडक्यात गमवावा लागला.

पाकच्या डावामध्ये फरहानने 60 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकारांसह 100 तर फक्र झमानने 42 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांसह 84 धावा झळकविल्या. यानंतर पाकच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत पाकने 64 धावा झोडपल्या. फरहानने 32 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह तर झमानने 27 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतके झळकविली. फरहानने 59 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकारांसह शतक पूर्ण केले. या स्पर्धेतील फरहानचे हे दुसरे शतक आहे. तर पाकची टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. पाकच्या डावात 9 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे मधुशंकाने 33 धावांत 3 तर शनाका 42 धावांत 2 आणि चमीराने 48 धावांत 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात कर्णधार दासुन शनाकाने 31 चेंडूत 8 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 76 धावा झळकविल्या. तत्पूर्वी रत्ननायकेने 37 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 58, मिशाराने 15 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 26, असालेंकाने 18 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 25 धावा केल्या. शनाकाच्या समयोचित फटकेबाजीमुळे लंकेला शेवटच्या षटकांतील 2 चेंडूवर विजयासाठी सहा धावांची जरुरी होती. पण त्यांना केवळ एक धाव घेता आल्याने पाकने हा सामना 5 धावांनी जिंकला. लंकेने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकांत 49 धावा जमविताना 2 गडी गमविले. लंकेने 200 धावा 117 चेंडूत नोंदविल्या. लंकेच्या डावात 14 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे अब्रार अहमदने 23 धावांत 3 तर शाहीन आफ्रिदी, नसीम शहा आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : पाक 20 षटकांत 8 बाद 212 (साहीबजादा फरहान 100, फक्रझमान 84, शदाबखान 7, उस्मान खान नाबाद 8, मधुशंका 3-33, शनाका 2-42, चमीरा 1-48), लंका 20 षटकांत 6 बाद 207 (शनाका नाबाद 76, रत्ननायके 58, असालेंका 25, मिशारा  26, अवांतर 9, अब्रार अहमद 3-23, शाहीन आफ्रिदी, नसीम शहा आणि मोहम्मद नवाज प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.