For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानने दहशतवाद सोडला पाहिजे!

02:39 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानने दहशतवाद सोडला पाहिजे
Advertisement

सिंधू जलवितरण करार तोपर्यंत स्थगितच ठेवणार : भारताची कठोर भूमिका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पाकिस्तानने दहशतवादाचा त्याग करेपर्यंत सिंधू जलवितरण करार स्थगितच राहील, अशी स्पष्टोक्ती भारताने केली आहे. पाकिस्तानने भारताविरुद्धच्या दहशतवादाला आश्रय आणि सहकार्य दिल्यामुळेच हा करार स्थगित करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. यामुळे जोपर्यंत यासंबंधी स्थितीत परिवर्तन होत नाही, तो पर्यंत या कराराचा पुनर्विचार करता येणार नाही. हे पाकिस्तानने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, असे भारताच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत शुक्रवारी भारताच्या धोरणाचा पुनरुच्चार केला. त्यांनी बांगला देशशी असलेल्या तीस्ता नदी वादावरही प्रकाश टाकला. या नदीवरील प्रकल्पाचे कंत्राट चीनला देण्याचा विचार बांगला देशने चालविला आहे. भारताने या संबंधातील आपला दृष्टीकोण बांगला देशसमोर ठेवला असून भारताची भूमिका यासंबंधात अत्यंत स्पष्ट आहे, असे प्रतिपादन रणधीर जयस्वाल यांनी केले.

पाकिस्तानची धमकी

भारताने सिंधू पाणी करार स्थगित ठेवून पाकिस्तानचे पाणी अडविल्यास भारतावर अणुहल्ला करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानचे नेते आणि माजी मंत्री बिलावल भुत्तो यांनी ही धमकी काही दिवसांपूर्वी दिल्याने तणाव निर्माण झाला होता. भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न या धमकीच्या माध्यमातून पाकिस्तानने केला होता. भारताने हा करार पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी स्थगित केला आहे.

रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत

पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देण्याचे धोरण न सोडल्यास सिंधू पाणी वाटप करार स्थगितच राहील, असे भारताने अनेकदा स्पष्ट केले आहे. रक्त आणि पाणी एकाचवेळी वाहू शकणार नाहीत. दहशतवादाला आपण पाठिंबा देत नाही, हे पाकिस्तानने कृतीने सिद्ध केले पाहिजे. तसेच ही कृती विश्वासार्ह असली पाहिजे. तरच या विषयावर पाकिस्तानशी चर्चा केली जाऊ शकते, ही भारताची भूमिका असून पाकिस्तान यामुळे धास्तावला आहे. त्यामुळे तो पोकळ धमक्या देत आहे. पाकिस्तानच्या प्रशासनावर तेथील लष्कर आणि दहशतवादी संघटना यांचे नियंत्रण असल्याने ते सरकार एक बाहुले असल्याप्रमाणे वागते, अशी टीकाही होत आहे.

Advertisement
Tags :

.