For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकची वनडे मालिकेत विजयी सलामी

06:41 AM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकची वनडे मालिकेत विजयी सलामी
Advertisement

ऑस्ट्रेलियाचा पाच गड्यांनी पराभव : अराफत मिनहास ‘सामनावीर’, बाबर आझम, गाझी घोरी यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था, रावळपिंडी

बाबर आझम आणि गाझी घोरी यांची दमदार अर्धशतके तसेच ‘सामनावीर’ अराफत मिनहासच्या 5 बळींच्या जोरावर यजमान पाकिस्तानने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी सलामी देताना ऑस्टेलियाचा 5 गड्यांनी पराभव केला.

Advertisement

या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. पाकच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 44.1 षटकात 200 धावांत आटोपला. त्यानंतर पाकने 42.3 षटकात 5 बाद 202 धावा जमवित आपला विजय नोंदविला.

ऑस्ट्रेलियाच्या डावात मॅथ्यू शॉर्ट आणि मॅट रेनशॉ यांनी समयोचित अर्धशतके झळकवली. कॅरे आणि शॉर्ट या सलामीच्या जोडीने 7 षटकात 34 धावा जमविल्या. अब्रार अहमदने कॅरेला 19 धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार इंग्लिस अराफत मिनहासच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 1 चौकारासह 13 धावा केल्या. लाबुशेन खाते उघडण्यापूर्वी मिनहासच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अराफत मिनहासने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देताना कॅमेरुन ग्रीनचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 4 बाद 68 अशी स्थिती होती. शॉर्ट आणि रेनशॉ यांनी पाचव्या गड्यासाठी 55 धावांची भागिदारी केली. शॉर्टने 76 चेंडूत 6 चौकारांसह 55 धावा केल्या. नवोदित युवा खेळाडू ऑलिव्हर पीकने 1 चौकारासह 7 धावा केल्या. अब्रार अहमदने रेनशॉचा त्रिफळा उडविला. त्याने 63 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 61 धावा जमविल्या. कुहेनमनने 40 चेंडूत 2 चौकारांसह 24 धावा केल्याने ऑस्ट्रेलियाला 200 धावांची मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 10 षटकात 51 धावा जमवितान 1 गडी गमविला. पाकतर्फे अराफत मिनहासने 32 धावांत 5 तर अब्रार अहमदने 44 धावांत 2 तसेच हॅरिस रौफ, शाहिन आफ्रिदी आणि सलमान आगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

शतकी भागिदारी

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावात सलामीच्या फरहानने 33 चेंडूत 3 चौकारांसह 28 तर सदाकतने 1 चौकारासह 8 धावा केल्या. पाकची ही सलामीची जोडी 49 धावांत बाद झाली. त्यानंतर बाबर आझम आणि गाझी घोरी यांनी तिसऱ्या गड्यासाठी 127 धावांची शतकी भागिदारी केली. बाबर आझमने 94 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 69 तर घोरीने 92 चेंडूत 8 चौकारांसह 65 धावा जमविल्या. बाबर आझम बाद झाला त्यावेळी पाकला विजयासाठी 25 धावांची गरज होती. सलमान आगा 6 धावांवर पायचीत झाला. अराफत मिनहास आणि अब्दुल समद यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. मिनहास 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18 धावांवर तर समद एका धावेवर नाबाद राहिले. 42.3 षटकात पाकने 5 बाद 202 धावा जमवित हा सामना 5 गड्यांनी जिंकला. ऑस्ट्रेलियातर्फे नाथन इलिसने 2 तर कुहेनमन, तनवीर सांघा आणि लाबुशेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया 44.1 षटकात सर्वबाद 200 (रेनशॉ 61, शॉर्ट 55, कुहेनमन 24, इंग्लिस 13, कॅरे 19, अवांतर 13, अराफत मिनहास 5-32, अब्रार अहमद 2-44, शाहिन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि सलमान आगा प्रत्येकी 1 बळी), पाक 42.3 षटकात 5 बाद 202 (बाबर आझम 69, गाझी घोरी 65, फरहान 28, अराफत मिनहास नाबाद 18, अवांतर 7, इलिस 2-45, कुहेनमन, सांघा आणि लाबुशेन प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.