पाकची विजयासह मालिकेत बरोबरी
वृत्तसंस्था / बुलावायो
पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकने यजमान झिम्बाब्वेचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव करुन बरोबरी साधली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकला पराभवाचा धक्का दिला होता. या दुसऱ्या सामन्यात नाबाद 113 धावा व 1 बळी टिपणाऱ्या पाकच्या सईम आयुबला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पाकच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा डाव 32.3 षटकात 145 धावांत आटोपला. त्यानंतर पाकने 18.2 षटकात बिनबाद 148 धावा जमवित हा सामना 10 गड्यांनी जिंकला.
झिम्बाब्वेच्या डावामध्ये मेअर्सने 30 चेंडूत 6 चौकारांसह 33, सिन विलियम्सने 39 चेंडूत 2 चौकारांसह 31, कर्णधार इर्विनने 1 चौकारांसह 18, सिकंदर रझाने 2 षटकारांसह 17, बेनेटने 14 आणि मुझारबनीने 1 षटकार 1 चौकारांसह 11 धावा जमविल्या. झिम्बाब्वेच्या डावात 3 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे अब्रार अहमदने 33 धावांत 4 तर सलमान आगाने 26 धावांत 3, सईम आयुब व फैजल अक्रम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सईम आयुब आणि अब्दुल शफीक या सलामीच्या जोडीने 18.2 षटकात बिनबाद 148 धावा जमवित आपल्या संघाला 10 गड्यांनी विजय मिळवून दिला. सईम आयुबने 62 चेंडूत 3 षटकार आणि 17 चौकारांसह नाबाद 113 तर शफीकने 48 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 32 धावा जमविल्या. पाकच्या डावात 3 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. या सामन्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना पाकची ही सलामीची जोडी फोडता आली नाही. या सामन्यात पाकच्या सईम आयुबने नाबाद शतक झळकविल्याने तो ‘सामनावीरा’चा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक: झिम्बाब्वे 32.3 षटकात सर्वबाद 145 (मेअर्स 33, इर्विन 18, विलियम्स 31, सिकंदर रझा 17, बेनेट 14, मुझारबनी 11, अवांतर 6, अब्रार अहम्मद 4-33, सलमान आगा 3-26, सईम आयुब 1-16, फैजल अक्रम 1-19), पाक 18.2 षटकात बिनबाद 148 (सईम आयुब 62 चेंडूत 3 षटकार आणि 17 चौकारांसह नाबाद 113, तर शफीक 46 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 32).