पाकिस्तान बनवतोय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
अमेरिकेवरही विश्वास उरला नसल्याचे दिले संकेत
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
वेळप्रसंगी अमेरिकेवरही हल्ला करता यावा, अशी तयारी पाकिस्तान करीत आहे. त्याने गुप्तपणे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रनिर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला आहे, असे स्पष्ट होत आहे. या क्षेपणास्त्राची अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असेल, असा दावा काही अभ्यासकांकडून करण्यात येत आहे.
अमेरिकेने नुकताच इराणच्या अण्विक तळांवर हल्ला केला आहे. इराणने अण्वस्त्रे बनविता कामा नयेत, असा अमेरिकेचा आग्रह आहे. त्यामुळे पाकिस्तान सावध झाला असून आपल्या अणुतळांवरही अमेरिका किंवा अन्य कोणता देश हल्ला करु शकतो, या भीतीने त्याला सतावले आहे. तसा हल्ला अमेरिका किंवा अन्य कोणत्या देशाकडून झाल्यास आपल्यालाही तशाच प्रकारे प्रत्युत्तर देता आले पाहिजे. वेळप्रसंगी दूर अंतरावर असलेल्या देशावरही अण्वस्त्र डागता आले पाहिजे, असा पाकिस्तानचा विचार असल्याचे आता उघड होत आहे. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत. तथापि, ती दूरवरच्या देशांवर टाकण्यासाठी यंत्रणा त्या देशाकडे नाही. पाकिस्तानकडे अणुबाँब वाहून नेणारी काही विमाने आहेत. तथापि, ती अधिक दूर जाऊ शकत नाहीत. म्हणून त्याची आंतरखंडीय अण्वस्त्रवहनक्षम दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र बनविण्याची तयारी सुरु आहे. अशा क्षेपणास्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान त्याला चीन आणि इराणकडून दिले जात आहे, अशी माहिती अमेरिकेला गुप्तचर संस्थानी दिली आहे, असे काही अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानचा दावा
आपला अणुकार्यक्रम केवळ भारताला घाबरविण्यासाठी आहे. भारताकडे अण्वस्त्रे आहेत. भारताला आपल्यावर अण्वस्त्रे डागण्याचे धाडस होऊ नये, यासाठी आपण अण्वस्त्रे बनविलेली आहेत. अन्य कोणत्याही देशावर अण्वस्त्रे डागण्याची आपली महत्वाकांक्षा नाही, असा दावा पाकिस्तानने वारंवार केला आहे. तथापि, अमेरिका आणि इराण यांच्यात जो संघर्ष नुकताच झाला, त्या संघर्षामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. अमेरिका आपली अण्वस्त्रे नष्ट करेल काय हा प्रश्न पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळे आपली क्षेपणास्त्र सक्षमता वाढविण्याचा प्रयत्न त्याने नुकताच सुरु केला आहे, असे अमेरिकेच्या काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.