भारताच्या प्रकल्पांची पाकिस्तानला भीती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधून पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांचे पाणी आडवून पाकिस्तानची कोंडी करण्याच्या योजनेला आता भारताने वेग दिल्याचे दिसून येत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहा दशकांपूर्वी झालेला सिंधू जलवितरण करार सध्या निलंबित अवस्थेत असल्याने भारतावर पाकिस्तानला पाणी सोडण्याची अनिवार्यता नाही. त्यामुळे भारताने सिंधू. रावी, बियास, चिनाब, सतलज आणि झेलम या सहा नद्यांच्या पाण्याचा भारताला जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी होण्याची शक्यता असल्याने तो देश धास्तावला असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवितरण करार स्थगित केला होता. तो आजही स्थगित अवस्थेतच आहे. त्यामुळे भारत आपल्या भागात पाणी आडविण्याच्या अनेक योजनांवर काम करत आहे. सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या यांचे जास्तीत जास्त जल भारतात उपयोगात आणले जावे, यासाठी भारताने चार मोठ्या योजनांवर कार्य करण्यास प्रारंभ केला आहे. नुकतीच भारताच्या पर्यावरण विभागाने 260 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेच्या दुलहस्ती प्रकल्पाला मान्यता दिली असून त्यावर कामास प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकल्पाची चर्चा राजीव गांधी यांच्या काळापासून करण्यात येत होती. तथापि, त्यानंतर ती प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टीने गंभीरपणाने पावले टाकण्यात आली नाहीत. या योजनेचा केवळ प्रथम टप्पा इतक्या वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आला होता. आता केंद्र सरकारने ही योजना गंभीरपणाने घेतल्याचे दिसून येत आहे. दुलहस्ती प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. आणखी चार प्रकल्पही योजिले आहेत.