पाक मजबूत स्थितीत, विंडीजवर 202 धावांची आघाडी
साजिदचा भेदक मारा, मसूदचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ मुल्तान
नौमन अली व साजिद खान या फिरकी द्वयीने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी पाकिस्तान मजबूत पकड मिळवून दिली असून दुसऱ्या दिवशीअखेर पाकने दुसऱ्या डावात 3 बाद 109 धावा जमवित विंडीजवर 202 धावांची आघाडी घेतली आहे.
सौद शकील (84) व मोहम्मद रिझवान (71) यांनी पाचव्या गड्यासाठी 141 धावांची भागीदारी केल्यानंतर पाकने पहिल्या डावात 230 धावा जमविल्यानंतर विंडीजचा पहिला डावही नौमन अली व साजिद खानच्या भेदक माऱ्यापुढे 137 धावांत आटोपल्याने पाकला 93 धावांची आघाडी मिळाली. विंडीजची स्थिती 8 बाद 66 अशी असताना वॉरिकन, मोती व सील्स यांनी फटकेबाजी करीत संघाला सव्वाशेच्या पुढे मजल मारून दिली. अलीने 39 धावांत 5 ते साजिदने 65 धावांत 4 बळी मिळवित डावात 5 बळी मिळविण्याची अलीची ही सातवी वेळ आहे. विंडीजतर्फे गोलंदाजीत 3 बळी मिळविलेल्या जोमेल वॉरिकनने फटकेबाजी करीत 4 चौकार, 1 षटकारासह नाबाद 31 धावा काढल्या. याशिवाय जेडेन सील्सने 22, गुडाकेश मोतीने 19, कर्णधार ब्रेथवेट व केविन सिंक्लेअर यांनी प्रत्येकी 11 धावा जमविल्या. इतरांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
पाकच्या दुसऱ्या डावात कर्णधार शान मसूदने 70 चेंडूत 52 धावा जमविल्या. त्याचा सलामीचा जोडीदार मुहम्मद हुरेराने 29 धावा जमविल्या. दिवसअखेर पाकने 3 बाद 109 धावा जमवित एकूण 202 धावांची आघाडी मिळविली. दिवसअखेर कामरान गुलाम 9 व सौद शकील 2 धावांवर खेळत होते. पाकचे दोन्ही बळी वॉरिकनने मिळविले.
संक्षिप्त धावफलक : पाक प.डाव सर्व बाद 230 : शकील 84, रिझवान 71, साजिद खान 18, अवांतर 18, जेडेन सील्स 3-27, सिन्क्लेअर 2-61, वॉरिकन 3-69, मोती 1-48, विंडीज प.डाव 25.2 षटकांत सर्व बाद 137 : वॉरिकन नाबाद 31, सील्स 22, मोती 19, अवांतर 22, नौमन अली 5-39, साजिद खान 4-65.
पाक दु. डाव 31 षटकांत 3 बाद 109 : मसूद 52, हुरेर 29, बाबर आझम 5, गुलाम खेळत 9, शकील खेळत आहे 2, वॉरिकन 2-17.