अमेरिकेच्या कारवाईमुळे पाकिस्तान कोंडीत
ट्रम्प यांचे नोबेल नामांकन रद्द करण्याची होतेय मागणी
पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांतिदूत संबोधित त्यांच्यासाठी नोबेल पुरस्काराची मागणी केली होती. पाकिस्तानने भारतासोबतचा संघर्ष थांबविण्याचे श्रेय ट्रम्प यांना दिले आहे. भारतासोबत आण्विक युद्ध झाले असते, परंतु ट्रम्प यांनी ते रोखले आहे. याचमुळे त्यांना जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळायला हवा, अशी भूमिका पाकिस्तानने मांडली होती. परंतु शाहबाज शरीफ सरकारचा हा कूटनीतिक डाव आता पाकिस्तानसाठी अडचणीचा ठरला आहे.
अमेरिकेने रविवारी इस्रायलसोबत मिळून इराणवर विध्वंसक हल्ले केले. तर दुसरीकडे पाकिस्तान इराणच्या समर्थनार्थ वक्तव्यं करत होता. पाकिस्तान धर्माच्या नावावर इराणसोबत उभे राहणार असल्याचा दावा करत होता, परंतु आता पाकिस्तानची जनता, राजकीय नेते आणि तज्ञ शाहबाज सरकारने ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी मागे घ्यावी याकरता दबाव निर्माण करत आहेत.
नोबेल नामांकन मागे घेण्याचा अर्थ ट्रम्प यांचे शत्रुत्व पत्करणे ठरणार आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत राजकारणात शाहबाज शरीफ आणि सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी इराणच्या पाठीत सुरा खूपसल्याची टीका होत आहे. पाकिस्तानने इराणवरील हल्ल्याची निंदा केली आहे. पाकिस्तान भारताला कोंडीत पकडण्यासाठी ट्रम्प यांच्यासाठी नोबेलची मागणी करत होता, परंतु याचमुळे मुस्लीम जगतात पाकिस्तान टीकेचा धनी ठरला आहे.
पाकिस्तानातील मोठे नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींनी ट्रम्प यांच्यासाठी 2026 च्या नोबेल शांतता पुरस्काराच्या नामांकनावर पुनर्विचार करण्याची सूचना शाहबाज सरकारला केली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि विदेशमंत्री इशाक डार यांची स्वाक्षरी असलेले शिफारसपत्र नॉर्वेच्या नोबेल शांतता पुरस्कार समितीला पाठविण्यात आले आहे. परंतु अमेरिकेने इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ला करताच शाहबाज सरकारचा हा निर्णय टीकेचा धनी ठरला आहे. शाहबाज सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. अध्यक्ष ट्रम्प यांचा शांततेचा दावा खोटा ठरला आहे. नोबेल पुरस्काराची शिफारस मागे घेतली जावी. ट्रम्प आणि सैन्यप्रमुख मुनीर यांच्या भेटीमुळे पाकिस्तानचे सत्ताधारी इतके आनंदून गेले की, त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी नोबेलचीच मागणी केली. पॅलेस्टाइन, सीरिया, लेबनॉन आणि इराणवरील इस्रायलच्या हल्ल्याचे ट्रम्प यांनी समर्थन केले आहे. ट्रम्प हे शांततेचे प्रतीक कसे ठरू शकतात, अफगाण आणि पॅलेस्टिनी लोकांच्या रक्ताने माखलेले अमेरिकेचे हात शांततेचा दावा कसे करू शकतात, असे वक्तव्य जमीयत उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख मौलान फजलुर रहमान यांनी केले आहे.