पाकिस्तानने पुन्हा पसरले हात
हवाई सुरक्षा यंत्रणेसाठी पाकिस्तानची अमेरिकेकडे मागणी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविला आहे. प्रथम भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य कारवाई करत 9 दहशतवादी अड्डे नष्ट केले आणि मग पाकिस्तानच्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाई करत त्याचे 11 सैन्य तळांवर विध्वंस घडवू आणला. भारताची हवाई सुरक्षा आणि सैन्य पराक्रमासमोर पाकने सपशेल शरणागती पत्करली. अशास्थितीत आता शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी पाकने अमेरिकेसमोर याचना केली आहे.
पाकिस्तानच्या 13 सदस्यीय शिष्टमंडळाने वॉशिंग्टनमध्ये जाहीरपणे अत्याधुनिक अमेरिकन शस्त्रास्त्रांची मागणी केली आहे. पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांनी अमेरिकेने हवाई सुरक्षा यंत्रणा व लढाऊ विमाने पुरवावीत, अशी विनवणी केली आहे.
भारत 80 विमाने 400 क्षेपणास्त्रांसह सामोरा आला होता, ज्यातील काही क्षेपणास्त्रs अण्वस्त्रवाहून नेण्यास सक्षम होती. आमच्यासोबत काय घडले हे सर्वांना माहित आहे. आमच्याकडे हवाई सुरक्षा यंत्रणा नसती तर आम्ही ढिगाऱ्याखाली चिरडलो गेलो असतो. भारत जे तंत्रज्ञान वापरतोय ते अत्यंत प्रगत आहे. याचमुळे संबंधित तंत्रज्ञान आम्हाला पुरवा, आम्ही ते खरेदी करू असे पाकिस्तानचे मंत्री मलिक यांनी अमेरिकेत बोलताना म्हटले आहे.
शाहबाज यांच्या दाव्याची पोलखोल
मलिक हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे सदस्य आहेत. हे शिष्टमंडळ सध्या अमेरिकन अधिकारी आणि खासदारांसोबत चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आहे. पाकिस्तानने देखील भारताची नक्कल करत स्वत:चे एक शिष्टमंडळ विदेश दौऱ्यावर पाठविले आहे. पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतच्या संघर्षात पाकिस्तानचा विजय झाल्याचा दावा केला होता. भारताला संघर्षविरामासाठी भाग पाडले आणि पाकिस्तानचा विजय झाल्याचा कांगावा शाहबाज यांनी केला होता. परंतु पाकिस्तानच्या मंत्र्याचे वक्तव्य हे शाहबाज यांच्या दाव्याच्या अत्यंत उलट आहे. एकप्रकारे ते शाहबाज यांच्या दाव्याची पोलखोल करणारे आहे.