पाकिस्तानची कोणतीही भूमिका नाही
गाझा सुरक्षा सेनेसंदर्भात इस्रायलकडून स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / जेरुसलेम
गाझा पट्टीची सुरक्षा करण्यासाठी स्थापन होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सैन्यदलात पाकिस्तानच्या लष्कराचा समावेश असणार नाही, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. या सैन्यदलाची स्थापना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या पुढाकाराने निर्माण करण्यात आलेल्या योजनेच्या अनुसार केली जाणार आहे. या सैन्यदलात पाकिस्तानच्या सेनेचा समावेश केला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, ही शक्यता इस्रालयने स्पष्टपणे फेटाळली आहे. पाकिस्तान लष्कराचे संबंध पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी आहेत. तर पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे संबंध हमास या गाझा पट्ठीतील दहशतवादी संघटनेशी आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराचा समावेश गाझा पट्टीच्या सुरक्षा सैन्यदलात करण्याची कल्पाना इस्रायलला मान्य नाही. तसेच हमासचे पूर्ण नि:शस्त्रीकरण झाल्याशिवाय पुढची राजकीय प्रक्रियेचा किंवा गाझा पट्टीच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात येणार नाही, असेही इस्रायलचे भारतातील राजदूत रेयुव्हेन आझार यांनी एका वृत्तसंस्थेशी वार्तालाप करताना स्पष्ट केले. गाझा पट्टी दहशतवादमुक्त करण्यासाठी सध्या पावले टाकली जात आहेत. मात्र, हमासचे पूर्ण नि:शस्त्रीकरण झाल्याखेरीज पुढची पावले टाकणे शक्य होणार नाही, अशी मांडणी त्यांनी केली.
अमेरिकेचा पुढाकार
गाझापट्टीचे हमासपासून संरक्षण करण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने एका आंतरराष्ट्रीय सैन्यदलाची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकेने अनेक देशांशी सैनिक पुरविण्यासंदर्भात संधान बांधले आहे. या देशांमध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. तथापि, अनेक देशांनी आपले सैनिक या सैन्यदलात पाठविण्यासंदर्भात अनिश्चितता प्रकट केली आहे. या देशांना हमासशी संघर्ष करण्यात कोणताही रस नाही. त्यामुळे सध्या तरी असे आंतरराष्ट्रीय सैनिक दल स्थापन केले जाणे शक्य होणार नाही, असेही रेयुव्हेन आझार यांनी स्पष्ट केले.
आम्हाला नाही मान्य...
या आंतरराष्ट्रीय सैन्य दलात पाकिस्ताच्या सेनेचा समावेश इस्रायलला मान्य होणार नाही. आमचा पाकिस्तानच्या लष्करावर विश्वास नाही. ज्या देशांशी इस्रायलचे योग्य असे राजनैतिक संबंध आहेत, अशा देशांच्या सैनिकांनाच या सैन्यदलात प्रवेश दिला जावा, अशी इस्रायलची भूमिका आहे. त्यामुळे पाकिस्तानचा प्रश्न सध्या उपस्थित होत नाही, असेही प्रतिपादन त्यांनी उत्तर देताना केले.
मुख्य अट हमाससंदर्भात
हमास या दहशतवादी संघटनेचे संपूर्ण नि:शस्त्रीकरण झाल्याशिवाय पुढचे काहीही होणार नाही, यावर इस्रायल ठाम आहे. हमासचे नि:शत्रीकरण ही मुख्य अट आहे. ती पूर्ण झाली नाही, तर कोणताच मुद्दा पुढे सरकणार नाही. सध्या आम्ही इस्रायलचे जे नागरीक हमासने ओलीस ठेवले आहेत, त्या सर्वांची सुटका आणि हमासच्या बंदीवासात असताना ज्या ओलीसांचे निधन झाले आहे, त्यांचे अवशेष परत मिळविणे, या एका मुद्द्यालाच प्राधान्य देत आहोत. हा महत्वाचा टप्पा पार झाल्याशिवाय इतर कोणत्याही टप्प्याचा प्रारंभही होऊ शकत नाही. आम्हाला नंतर कोणतीही समस्या उद्भवायला नको आहे, अशीही स्पष्टोक्ती आझार यांनी केली.