पाककडून सलमान खान ‘दहशतवादी’ घोषित
सौदीमध्ये केलेल्या विधानामुळे थयथयाट
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
सौदी अरेबियात झालेल्या ‘जॉय फोरम 2025’ दरम्यान बॉलिवूड अभिनेता सलमान खानने केलेल्या विधानामुळे पाकिस्तान सरकार संतप्त झाले आहे. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान ‘जॉय फोरम’मध्ये एकत्र आले होते. तिन्ही खानना एकाच मंचावर पाहणे चाहत्यांसाठी एक उत्तम मेजवानी होती. पण संभाषणादरम्यान सलमानने केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली. बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळे असल्यासंबंधीच्या विधानावर पाकिस्तानने तीव्र आक्षेप घेत त्याला दहशतवादी घोषित केले आहे. सलमानने केलेले वक्तव्य हे आपल्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
‘जॉय फोरम’च्या मंचावरील भाषणादरम्यान सलमान खानने विविध देशांतील कष्टाळू लोकांचा उल्लेख करताना हे बलुचिस्तानचे लोक आहेत, अफगाणिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत, सौदी अरेबियामध्ये सर्वजण कठोर परिश्रम करत आहेत.’ असे वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्यात बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांना वेगवेगळे संबोधण्यात आल्याने पाकिस्तानने संताप व्यक्त केला आहे.
दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत घोषणा
पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने लगेचच सलमान खानला दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत (1997) दहशतवादी घोषित केले. गृह मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची यादी म्हणजेच ‘चौथी अनुसूची’मध्ये अभिनेता सलमान खानला समाविष्ट केले आहे. या कारवाईअंतर्गत, सलमान खानच्या पाकिस्तानमधील क्रियाकलापांवर लक्ष ठेवले जाईल. त्याचा प्रवास, मालमत्ता आणि कोणत्याही सार्वजनिक उपस्थितीवर बंदी घातली जाऊ शकते. सलमानने बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे असल्याचे वर्णन केलेल्या विधानानंतर ही कारवाई करण्यात आली.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सलमान खानचे विधान जाणूनबुजून होते की अनावधानाने झालेली चूक होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो फक्त वेगवेगळ्या देशांतील लोकांच्या योगदानाचा उल्लेख करताना दिसतो. तरीही, पाकिस्तानने या विधानाला राजकीय वळण दिले आहे.
भारतीय सोशल मीडियावर संताप
पाकिस्तानी सरकारच्या या कृतीमुळे भारतीय सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सलमान खानचे चाहते पाकिस्तानच्या निर्णयाचा निषेध करत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी पाकिस्तानी सरकारचे हे पाऊल त्यांची निराशा आणि असहिष्णुता दर्शवते, असे म्हटले आहे. तसेच बलुचिस्तानचे माजी मंत्री डॉ. तारा चंद यांनी सलमान खानच्या विधानाचे कौतुक केले. सलमान खानने बलुचिस्तानमधील अत्याचारित लोकांची मने जिंकली आहेत. पाकिस्तानी सैन्य गेल्या 75 वर्षांपासून बलुचिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांची लूट करत असल्याचे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.