पाकिस्तान अण्वस्त्र नियंत्रण अमेरिकेकडे
मुशर्रफ यांना घेतले होते विकत, सीआयएच्या माजी अधिकाऱ्याकडून अनेक खळबळजनक गौप्यस्फोट
वृत्तसंस्था / कराची
‘पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे नियंत्रण अमेरिकेने अनेक वर्षांपूर्वीच आपल्याकडे घेतले आहे. पाकिस्तानचे दिवंगत प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांना अमेरिकेने कोट्यावधी डॉलर्सची उधळण करुन विकत घेतले. त्यांच्याकडून पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे नियंत्रण मिळविले. सध्याच्या स्थितीत भारताशी पारंपरिक पद्धतीचे युद्ध करण्याचा मूर्खपणा पाकिस्तानने केल्यास त्याचा पराभव निश्चित आहे,’ असे अनेक खळबळजनक गौप्यस्फोट अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएनचे माजी अधिकारी जॉन किरियाको यांनी एएनआय या प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले असून, त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे.
किरियाको यांनी सीआयएमध्ये उच्च पदांवर 15 वर्षे सेवा दिली होती. त्यांच्या सेवाकाळात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात कसे संबंध होते, यावर त्यांनी या मुलाखतीत प्रकाश टाकला आहे. विशेषत: त्यांनी अण्वस्त्र नियंत्रणाच्या संदर्भात जो गौप्यस्फोट केला आहे, तो अभूतपूर्व मानला जात आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे नियंत्रण नेमके कोणाकडे आहे, हा प्रश्न अनेकदा समोर आला आहे. त्याचे अप्रत्यक्ष उत्तरच किरियाको यांनी या मुलाखतीत दिल्याने तो चर्चेचा विषय झाला असून पाकिस्तान सरकार काय स्पष्टीकरण देणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
‘सिंदूर’ अभियानाच्या वेळी चर्चा
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी ‘सिंदूर अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानाच्या अंतर्गत पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला होता. त्या काळात पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या नियंत्रणाचा मुद्दा समोर आला होता. पाकिस्तान जरी आपल्याकडे अण्वस्त्रे असल्याचा टेंभा मिरवत असला आणि भारताला अणुयुद्धाची धमकी देत असला, तरी प्रत्यक्षात अण्वस्त्रांचे नियंत्रण अमेरिकेकडेच आहे, ही बाब त्यावेळी अनेक तज्ञांची स्पष्ट केली होती. पण कोणाचा फारसा विश्वास बसला नव्हता. पण आता सीआयएच्या माजी पदाधिकाऱ्यानेच हे स्पष्ट केल्याने पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे, अशी जोरदार चर्चा आता होत आहे.
मुशर्रफ विकावू नेता
पाकिस्तानचे त्यावेळचे प्रमुख परवेझ मुशर्रफ यांना अमेरिकेने विकत घेतले होते. त्याच्यासाठी अमेरिकेने कोट्यावधी डॉलर्स ओतले होते. मुशर्रफ यांनी पाकिस्तानात अमेरिकेला मुक्तहस्ते व्यवहार करण्याची अनुमती दिली होती. तथापि, त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा विश्वासघातही केला होता. दहशतवादाच्या संदर्भात ते अमेरिकेशी दुतोंडी खेळ करत होते. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात लढत आहे असे अमेरिकेला भासविताना त्यांनी भारतात दहशतवादी कायवाया वाढविल्या होत्या. दहशतवादाची लढण्याचा आभास निर्माण करुन त्यांनी अमेरिकेकडून लक्षावधी डॉलर्स उकळले. तथापि, दहशतवादाविरोधात त्यांनी कधीच गांभीर्याने संघर्ष केला नाही, असे अनेक खुलासे किरियाको यांनी केले आहेत. मुशर्रफ यांच्या काळात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात चांगले संबंध होते. अमेरिका तिला जे हवे आहे, ते पाकिस्तानच्या प्रशासनाकडून डॉलर्सच्या बदल्यात करुन घेऊ शकत होती. पाकिस्तान हा भ्रष्टाचाराने बजबजलेला देश आहे, असेही प्रहार जॉन किरियाको यांनी त्यांच्या या मुलाखतीत केले आहेत.
भारताच्या भूमिकेचा उल्लेख
2001 मध्ये भारताच्या संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच 2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतात घुसून मुंबईवर हल्ला केला होता. या दोन्ही वेळी भारत पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी त्याच्यावर हल्ला करेल, अशी शक्यता अमेरिकेला वाटत होती. तथापि, या दोन्ही वेळी, विशेषत: मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला करणे टाळले होते. भारताची ती नीती अमेरिकेला राजकीयदृष्ट्या समंजसपणाची आणि धोरणीपणाची वाटली होती. अमेरिकेचे संबंध नेहमीच हुकुमशहांशी जवळचे राहिलेले आहेत. कारण हुकुमशहांशी संबंध ठेवताना प्रसारमाध्यमे आणि जनतेची नाराजी यांचा प्रश्न उद्भवत नाही, असेही किरियाको यांनी या मुलाखतीतून स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानचा होईल पराभव
सध्याचा भारत पाकिस्तानविरोधात अधिक कठोर भूमिका घेत आहे. पाकिस्तानने भारतात दहशतवादी हल्ला घडवून आणल्यास भारत पाकिस्तानवर सूड उगविणार हे निश्चित आहे. तसेच आज भारताशी पारंपरिक पद्धतीने युद्ध करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केल्यास त्याला अशा युद्धात दारुण पराभव पत्करावा लागेल, असा रोखठोक इशाराही किरियाको यांनी या मुलाखतीतून दिला आहे.
पाकिस्तानात भ्रष्टाचाराची बजबजपुरी
ड पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांना मिळू नयेत म्हणून अमेरिकेचे नियंत्रण
ड परवेझ मुशर्रफ विकावू नेते, अमेरिकेने डॉलर्स टाकून केले होते अनेक सौदे
ड पाकिस्तान आणि इतर हुकुमशाही देशांशी अमेरिकेचे नेहमीच चांगले संबंध
ड भारताशी पाकिस्तानने पारंपरीक युद्ध केल्यास पाकिस्तानचा पराभव निश्चित